मुंबई : काँग्रेसने भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या गळ्यात महाराष्ट्र कार्याध्यक्षपदाची माळ घातली आहे. हंडोरे यांनी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिला होता. मात्र, सध्या हंडोरेंचे संभाव्य पक्षांतर रोखण्यास काँग्रेसला यश आल्याचे दिसत आहे. विधानसभेला पराभव आणि विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने हंडोरे पक्षावर नाराज होते. ते मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत.
काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला. विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे.
भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या गळ्यातही कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. विधानसभेला पराभव आणि विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्याने हंडोरे पक्षावर नाराज होते. त्यामुळे हंडोरेंचं संभाव्य पक्षांतर रोखण्यास काँग्रेसला यश आल्याचं चित्र आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते, मात्र शिवेसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. त्यातच विधान परिषदेवरही वर्णी न लागल्याने हंडोरे नाराज असल्याची माहिती होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता होती
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती.
नाशिकमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात होता. आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचंही चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं होतं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात होतं.