मुंबई : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वीज कंपन्यांकडून जास्तीची वीज बिल देण्यात आली होती. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसेनं राज्यभरात आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं तशी घोषणा केली होती. मात्र, नंतर पुन्हा घुमजाव करत वीज बिल माफी देणार नसल्याचं सांगितलं. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. आधी करु म्हणणारे अदानींच्या भेटीनंतर शब्दच फिरवल्याचे म्हटले आहे.
दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
* पाकिस्तानच्या बॉर्डरवरही इतका बंदोबस्त नाही
राज ठाकरे म्हणाले, “मी चायना किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरही इतका बंदोबस्त पाहिला नाहीये जितका शेतकऱ्यांसाठी केलाय. इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नाहीये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. ताणत ताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? 26 जानेवारी रोजी झालेली एक घटना काय घेऊन बसलाय?”
“शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन इतकं चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात. परंतु केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्य सरकारशी चर्चा करुन या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यात एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्राने या गोष्टींचा निर्णय घ्यायला हवा होता. हे प्रकरण इतकं चिघळण्याची आवश्यकता नव्हती,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय.
* नेमके काय म्हणाले राज ठाकरे
“या मुद्द्यावर राज्यपालांना भेटायला गेलो. राज्यपालांनी शरद पवार यांना बोलायला सांगितलं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा. ते पत्र मला पाठवा. त्यामध्ये अदानी असतील, एमएसईबी असो वा टाटा, मी त्यांच्याशी बोलतो, असं पवार म्हणाले होते. मग पाच सहा दिवसांनी मला असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर सरकारकडं असं आलं की, वीज बिल माफ केलं जाणार नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवार-अदानी बैठकीबद्दल शंका व्यक्त केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मुख्यमंत्री वा इतर सरकारी लोकं तुमच्याकडे येतात, त्यावेळी त्यांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आंदोलन केल्यावर तुम्ही केसेस टाकता. तुम्ही वीजदर माफही करत नाही आहात. लोकांना भरमसाठ बिलं भरायला सांगत आहात. कुणासाठी चालू आहे हे सगळं?”, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला. वीज खंडित करण्याच्या निर्णयावर राज म्हणाले,”या लोकांचा निर्दयीपणा मला समजतंच नाहीये. एकतर लोकांना पिळायचं वर निर्दयीपणे वागायचं. पैशांचा विचार नाही करायचा. कशाचा विचार करायचा नाही आणि वीज बिल माफ करणार नाही हा निर्णय कंपन्यांसोबत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेणदेणं झाल्याशिवाय हे झालं नसेल. सगळ्या कंपन्यांना पाठिंशी घालण्याचं काम सरकार करत आहे,” असा आरोपही राज यांनी केला.
* ‘रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?’
पॉपस्टार रिहानानं दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर देशात वाद सुरु झाला. यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले. “कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्व दिलं जातंय? तिनं ट्विट करण्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, अशी टीका राज यांनी केली.