मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर आला आहे. बँक घोटाळ्याप्रकरणी अमरावती मतदारसंघाचे 1996 पासून पाच वेळा खासदारकी राहिलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेल्या तक्रारीनंतर ईडीने ही चौकशी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधातील पुरावे ईडी कार्यालयात जमा केले होते.
शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सक्तवसुली संचालनालयात पोहोचले आहेत. येथे ईडीकडून त्यांची चौकशी होणार असून त्यामुळे ते ईडीच्या कार्यालयात हजार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर अडसूळ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात तक्रार केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अपक्ष आमदारासह भाजपा नेत्यांनी केली तक्रार
आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
“सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली होती.