नवी दिल्ली : ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी अभिनेता दीप सिद्धला काल दिल्ली पोलिसांनी अटक केली. दरम्यान, २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्ध सिंघू बॉर्डरवर आंदोलनस्थळी गेला. त्यानंतर तो एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. तिथे तो अनेक जणांना भेटला. या भेटणा-या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी अभिनेता दीप सिद्धूला काल दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली सत्र न्यायालयाने दीप सिद्धूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयटीओ येथे शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेली चकमक तसेच लाल किल्ल्यामध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा दीप सिद्धूवर आरोप आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा “तुम्ही दीप सिद्धूला अटक करत नाही, पण २०० शेतकऱ्यांना अटक करता” हा मुद्दा उपस्थित केला होता.
२६ जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू सिंघू बॉर्डरवर आंदोलनस्थळी गेला. त्यानंतर तो एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. तिथे तो अनेक जणांना भेटला. हिंसाचार झाला, त्या रात्री फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सिद्धूला भेटणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे, असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने सांगितले.
* अभिनेता असल्याने मिळाला सहारा
दीप सिद्धूच्या अटकेची मागणी सुरु झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी तो पंजाबला पळून गेला. तिथे तो त्याच्या समर्थकांना भेटला. सिद्धू प्रसिद्ध पंजाबी अभिनेता असल्यामुळे त्याला अनेक ठिकाणी आसरा मिळाला. तो पंजाब-हरयाणा सीमेवरील भागांमध्ये लपून बसला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. फरार असताना दीप सिद्धू मोबाइल वापरत नव्हता, त्यामुळे त्याला अटक करणे दिल्ली पोलिसांसाठी कठीण होऊन बसले होते. मागच्या पाच दिवसांपासून त्याने कपडे बदलले नाहीत तसेच आपण कुठे लपलोय, हे पोलिसांना समजेल म्हणून त्याने जास्त लोकांशी संपर्कही साधणे टाळले.