चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाची नोंद केली. विराटने या सामन्यात 72 धावांची खेळी केली. विराट कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या क्लाइव लॉईड यांना मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला.
इंग्लंडने टीम इंडियावर पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिल्या कसोटीत 227 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 4 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला 192 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 28 वं अर्धशतक ठरलं. यासह त्याने मानाच्या पंक्तीत आणखी एका क्रमांकाने झेप घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ठरला चौथा खेळाडू
विराट कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या क्लाइव लॉईड यांना पछाडत चौथा क्रमांक पटकावला आहे. लॉईड यांनी 74 कसोटींमध्ये नेतृत्व करताना 14 शतक आणि 27 अर्धशतकांसह 5 हजार 233 धावा केल्या आहेत. तर विराटने अवघ्या 57 सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे. विराटने यामध्ये 20 शतक आणि 14 अर्धशतक लगावत चौथा क्रमांक पटकावला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने कर्णधार म्हणून 8 हजार 659 धावा केल्या आहेत. यात त्याने 25 शतक आणि 36 अर्धशतक ठोकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्ये अॅलन बॉर्डर तर तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे.
* भारताचा चौथा कसोटी पराभव
टीम इंडियाचा कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील सलग चौथा पराभव ठरला. फेब्रुवारी 2020 पासून म्हणजेच गेल्या वर्षभरात टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात एकूण 4 कसोटी सामने खेळली आहे. या 4 ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला 2 वेळा न्यूझीलंड तर प्रत्येकी 1 वेळा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हाव लागलं आहे.
इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील दुसरी कसोटी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे.