मुंबई : महाराष्ट्र शासनाने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना परवानगी मिळाली नाही. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली. दुपारी सव्वाबारा वाजताच्या खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडला रवाना झाले.
राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. परंतु सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल आणि त्यांचा खासगी स्टाफ स्पाईसजेटच्या विमानाने रवाना झाले. मात्र सरकारी विमान नाकारल्याने पुन्हा राजकीय वादंग माजला आहे.