सोलापूर : उत्तर सोलापूर तालक्यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षी दिवंगत नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा उद्या शनिवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे यांनी दिली.
सोलापूर जिल्हा नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील प्रगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा असला तरी नेहमी अवर्षणग्रस्त म्हणूनच सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे.
प्रयोगशील, संशोधनवृत्तीची परंपरा कायम ठेवत दत्तात्रय काळे यांनी यंदाच्या दशकातील पहिल्याच वर्षात नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे नवे वाण उत्पादित केले आहे. नियमित द्राक्षापेक्षा आकाराने, वजनाने मोठा असलेला आणि शेतकऱ्यांना सधन करणाऱ्या नव्या किंग बेरी या द्राक्ष वाणाची निर्मिती केली. या किंग बेरी द्राक्ष वाणाचे राष्ट्राला लोकार्पण देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 13) नान्नज येथे काळे यांच्या द्राक्ष बागेत होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री दादा भुसे, सहकार व पणनमंत्री श्याम पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधीची उपस्थित राहणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सोनाका सीडलेस जगप्रसिद्ध
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच द्राक्षाची लागवड करण्याचा मानही नानासाहेबांनी मिळवला. शेतीला सर्वस्व मानून त्यांनी द्राक्ष लागवडीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरवात केली. थॉमसन सीडलेस या द्राक्ष वाणामध्ये नैसर्गिक बदल घडवून एक लांब मणी असणारी व दिसायला आकर्षक आणि खाण्यास वेगळी चविष्ट असलेले द्राक्ष वाण विकसित करून त्याला सोनाका सीडलेस असे नामकरण केले. सोनाकामधून त्यांनी सोलापूर, आजोबाचे नाव, नान्नजचे नाव आणि आडनाव यातील अद्याक्षरे घेऊन एक ब्रॅंड केला तोच सोनाका सीडलेस जगप्रसिद्ध झाला.
* शरद पर्पल सीडलेस असे नामकरण
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील निवडक द्राक्ष बागायतदारांसाठी युरोप दौरा आयोजित केला. त्या दौऱ्यात एका वेगळ्याच द्राक्षाने त्यांचे मन मोहवून टाकले. त्याच वेळी त्यांनी तेथील त्या द्राक्षाच्या काही काड्या घेऊन आले आणि त्याचे लहान मुलासारखे संगोपन करीत रंगीत द्राक्ष वाण विकसित केले. युरोप दौऱ्याला जाताना देशाचे नेते शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन मनाला भावल्याने त्या वाणाला शरद पवार यांच नाव देऊन त्या रंगीत द्राक्ष वाणाला शरद पर्पल सीडलेस असे नामकरण 4 फेब्रुवारी 1990 रोजी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते केले. हे द्राक्ष लोकप्रिय झाले शेतकऱ्यांना त्यातून मोठी अर्थप्राप्ती होऊ लागली. नानासाहेब काळे यांच्या या नव्या द्राक्ष वाणाची दखल घेत 18 ऑगस्ट 1990 मध्ये वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार झाला. वडिलांचे शेतीतील कष्ट आणि शेतीवरील प्रेम पाहून चिरंजीव दत्तात्रय आणि सारंग यांनीही शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
* द्राक्षाचे तीन पेटंट घेऊन चौथे पेटंट घेण्याच्या तयारीत
नवनवीन संशोधन करण्याची गोडी लावलेल्या द्राक्षाने दत्तात्रय काळे यांना वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणाची दृष्टीच दिली. द्राक्ष बागेतील प्रत्येक घडावर प्रयोग करून त्यांनी आपली निरीक्षक दृष्टी सिद्ध केली. प्रत्येक नव्या वाणामध्ये वेगळे वैशिष्ट्य होते. दत्तात्रय काळे यांनी देशासह परदेशात जाऊन विविध द्राक्ष वाणांची पाहणी आणि अभ्यास केला. देशातील द्राक्ष बागायत क्षेत्रातील एकूण 60 टक्के द्राक्षांचे वाण हे सोलापूरच्या नान्नज येथील काळे परिवाराने निर्माण केलेल्या सोनाका, शरद सीडलेस या द्राक्ष वाणातूनच निर्माण झाले ही बाब सोलापूरच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. यातूनच अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन वाण उत्पादित करण्याची प्रेरणा घेऊन द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवत अनेक वाण निर्माण केले. याचे सर्व श्रेय नानासाहेब काळे परिवाराला आहे. द्राक्षाचे तीन पेटंट घेऊन चौथे पेटंट नव्याने विकसित केलेल्या किंग बेरीसाठी लवकरच पेटंट मिळणार असून अशा प्रकारे पेटंट घेणारे कृषिभूषण दत्तात्रय काळे हे देशातील एकमेव शेतकरी आहेत.