सांगली : केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी प्रत्येक कंटेनरला मिळणारे दीड लाखाचे अनुदान बंद केल्याचा सांगली जिल्ह्यातील 4211 शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अनुदानबंदीबरोबर डिझेलच्या दरातील वाढीमुळेही वाहतूक खर्च वाढला आहे. दरम्यान, बांगलादेशात गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेली निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.
युरोपमधील देशांत निर्यातीसाठी जिल्ह्यातील 4211 शेतकऱ्यांनी 2267 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी केली होती. या द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कंटेनरला दीड लाख रुपये अनुदान मिळत होते. केंद्र सरकारने ते बंद केल्यामुळे निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू असताना अचानक केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्यामुळे निर्यातदार द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युरोपमधील देशांत निर्यात होणाऱया द्राक्षाला सरासरी प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपये, तर आखाती देशांत 60 ते 85 रुपये दर मिळतो. सध्या तेवढा दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे.
सध्या जिल्ह्यात युरोपसह बांगलादेश, ओमान, दुबईसाठी द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी दाखल झाले आहेत. केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठीचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठीं जिल्ह्यातील निर्यातदार आणि निर्यातदार द्राक्ष उत्पादक खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर भूमिका मांडणार आहेत.