सोलापूर : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होती, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी सोलापुरात केलं आहे.
शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला, याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच त्यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय मात्र प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोप पवार यांनी केला.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील काही आंदोलक आक्रमक झाल्याचं सगळ्या देशाने पाहिलं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढाई करुन धुडघूस घातला. मात्र पुढच्या काही दिवसांत लाल किल्ल्यावरच्या धुडगूसीपाठीमागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशात शरद पवारांनी आज सोलापुरात हा मोठा आरोप केला आहे.