बार्शी : बनावट नोटा प्रकरणी वैराग पोलिसांनी अटक केलेला एक अरोपी आज बार्शीमध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारास नेत असताना त्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. सिध्देश्वर कैचे असे त्या आरोपीचे नाव असून तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.
वैराग आठवडी बाजारात शेळी खरेदी करुन बनावट नोटा दिल्याचा प्रकार घडला होता. याच दरम्यान जिल्ह्यातील मोहोळ, मोडनिंब या गावांमध्येही असाच प्रकार घडला होता. त्यापैकी मोडनिंबच्या बाजारात बनावट नोटा देवून पळून जाताना माढा तालुक्यातील सिध्देश्वर कैचे आणि त्याचा साथीदार धनाजी दाडे यास पकडले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे वैराग पोलिसांनी टेंभुर्णी पोलिसांकडून त्यांचा ताबा घेतला होता. त्यास बार्शी येथील न्यायालयात उभे करुन पाच दिवसांची पोलिस कोठडीही घेतली होती. त्यानंतर सोमवारी त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते.
यावेळी आरोपीने तब्येत ठीक नसल्याचा बहाणा करत रुग्णालयात नेण्याची मागणी केली. पोलिस त्यास घेवून जात असतानाच त्याने हातावर तूरी देऊन पलायन केले. या प्रकरणाचा तपास वैरागचे सपोनि. महारुद्र परजणे करत होते. अरोपी पळून गेल्याचे समजताच पोलिसांची पाचावर धारण बसली असून तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. अरोपी लवकरच आपल्या हाती लागेल, असा विश्वास पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.