चेन्नई : आयपीएल लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या 14 व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं.
मुंबई इंडियन्सनेच त्याच्यावर बोली लावत 20 लाखांमध्ये त्याला खरेदी केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने नुकतीच आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने सर्वांचीच नजर अर्जुन तेंडुलकरवर आहे. पण अर्जुन वडिलांप्रमाणे फलंदाज नसून वेगवान गोलंदाज आहे.
अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संघात घेण्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून काहीजणांनी नेपोटिझमची देखील टीका केली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धेने याबबत म्हणाला कि, आम्ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे निवड केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सचिनमुळे त्याच्यावर खूप दबाव असणार आहे. पण सुदैवाने तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. त्यामुळे आपण अर्जुनसारखी गोलंदाजी करु शकलो तर सचिनलाही अभिमान वाटेल,” असं महेला जयवर्धेनेने म्हटलं आहे.
सचिन आपल्या आयपीएलच्या कारकीर्दीत फक्त आणि फक्त मुंबईतून खेळला. 2008 पासून 2013 पर्यंत सचिन मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. निवृत्तीनंतरही तो मुंबईचा आयकॉन आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव आयपीएलच्या लिलावात आलं तेव्हाच मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे मुंबई इंडियन्सले 20 लाखांच्या मूळ किंमतीत अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं आहे.आश्चर्य म्हणजे मुंबईशिवाय इतर कोणत्याही संघाने अर्जुनमध्ये रस दाखविला नाही त्यामुळे तो मुंबईच्या संघाचा भाग बनणार हे निश्चित होतं असं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही.
दरम्यान,21 वर्षीय अर्जुनने आतापर्यंत दोन टी -20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याच्याकडे तीन धावा आणि दोन बळी आहेत. टी -20 मधील अर्जुनची इकॉनमी 9.57 आहे. यावर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली करंडकातून टी -२० मध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात अर्जुनने तीन षटकांत 34 धावा देऊन एक गडी बाद केला तर फलंदाजीमध्ये तो शून्यावर नाबाद राहिला. दुसऱ्या सामन्यात त्याने पुडुचेरीविरुद्धच्या सात चेंडूंमध्ये तीन धावा केल्या, तर बोलिंगमध्ये चार षटकांत 33 धावा देऊन एक विकेट घेतली.