सोलापूर : खंडणी, धमकावणे, शिवीगाळीसह गुन्हा दाखल असलेले उपमहापौर राजेश काळे यांचे सदस्यत्व रद्दच्या कारवाईचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने बहुमताने मंजूर केला. यावेळी राजेश काळे सभागृहात उपस्थित होते. भाजपचे उपमहापौर असूनही भाजपवरच हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. काही दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.
तत्पूर्वी सभा सुरु होण्यापूर्वी उपमहापौर काळे डायसवर न बसता सभागृहात आले आणि त्यांनी ज्येष्ठ नगरसेवक बेरिया, कोठे यांना विचारले की, माझ्याविरोधात प्रस्ताव आहे, मी डायसवर बसू का, विषय येईपर्यंत बसा, असे मार्गदर्शन मिळाल्यानंतर काळे डायसवर जाऊन बसले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. मनपा उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपचे उपमहापौर काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. काळे यांचे सदस्यत्व रद्दसाठी शासनाकडे सभागृहाने ठराव करून पाठविण्यासाठी प्रशासनाने सभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव दिला होता.
या प्रस्तावाला समर्थन करत सत्ताधारी भाजपने काळेंविरोधात कारवाईच्या शिफारशीची सूचना मांडली. पण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आदी सर्वच विरोध पक्षांनी काळेंना एक संधी द्यावी, असे सांगत कारवाईला विरोध केला. काळेंच्या वर्तणुकीचे समर्थन करत नाही, पण काळेंवर रितसर कारवाई करा, असे सांगत काँग्रेसचे नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी उपमहापौर काळेंच्या बाजू मांडणारी वकिली केली. नैसर्गिक न्याय काळेंना द्यावा, असे म्हणत या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली.
सत्ताधारी भाजपने मात्र कारवाईवर ठाम राहात मतदान घेतले. ठरावाच्या बाजूने 33, विरोधात 29, तर तटस्थ 4 मतदान झाले. शिवसेनेचे गणेश वानकर, गुरुशांत धुत्तरगावकर, भारतसिंग बडुरवाले, राजकुमार हंचाटे हे चार नगरसेवक मतदानात तटस्थ राहिले. अखेर भाजपची सूचना बहुमताने मंजुरीचे रुलिंग महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिले.