उस्मानाबाद : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यातच आता, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोनावरील लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लसीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असतानाच खुद्द जिल्हाधिकारी यांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली असून कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं असून जनतेची चिंता मात्र वाढली आहे. देशात कोरोना लसीकरण चालू असून देखील रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच दरम्यान आता कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. त्यामुळे लसीच्या प्रभावबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता. त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगीकरणात आहेत.