नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवारी व रविवारी बंद राहणार आहेत. लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद असणार आहेत.
करोनाच्या वाढत्या रुग्णांमुंळे मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील काल रविवारी जनतेशी संवाद साधताना परिस्थिती पाहून पुढील आठ दिवसांत लॉकडाउनसंबंधी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यातच आता करोना रुग्ण वाढणाऱ्या नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लॉकडाउन नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळत आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. करोनाचे सर्वाधिक रुग्ण ३० ते ४० वयोगटातील असून रुग्ण वाढण्याला मुखपट्टी न घालणे, शारीरिक अंतर न ठेवण्यासह बिनधास्त फिरणेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, शिकवणी वर्ग, मॉल्स व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू असून त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.