पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदो उदोच्या नादात मोठी चूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते,असा अजब दावा पुण्यात करुन टाकला आहे. यामुळे ते आता ट्रोल होत आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे इतिहासच विसरले आहेत. नुसता इतिहास विसरले नाहीत तर त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निर्णय चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर खपवला आहे. भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित युव वॉरियर्स या पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधक नाहीत असा दावा करण्याच्या नादात चंद्रकांत दादांनी चक्क मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते,असा अजब दावा करुन टाकला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नरेंद्र मोदी यांचा उदोउदो करण्याच्या नादात चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने चुकीचा इतिहास मांडल्याचे सिद्ध झाले आहे. केवळ एवढेच नाहीतर भाजपला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात मोलाचा वाटा असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे कर्तृत्व मोदींच्या नावावर खपवण्याचा प्रयत्नही त्यांनी केल्याचे दिसते आहे.
* असा आहे खरा इतिहास
वास्तविक ए.पी.जे अब्दुल कला यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यावेळी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २० पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय पातळीवर उदयसुद्धा झालेला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारुन जेमतेम वर्षभराचा कालावधी लोटला होता. विशेष म्हणजे अब्दुल कलाम २००२ मध्ये राष्ट्रपती झाले. त्याचवर्षात नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी दंगली झाल्या होत्या आणि यात अनेक मुस्लिमांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप देखील झाला होता.