नवी दिल्ली : टीम इंडियाने इंग्लैंड विरोधातील डे-नाइट टेस्ट मध्ये दुसऱ्या दिवशीच सामना जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत 112 धावा केल्या होत्या. यानंतर भारताने 145 धावा केल्या. इंग्लंडने दुसरा डाव अवघ्या 81 धावात निपटला. भारताला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्त्युत्तरादाखल खेळतांना भारताने 10 गडी राखून सामना आपल्या नावे केला.
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेला सामना दुसऱ्या दिवशी जिंकत टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षर पटेलच्या सहा विकेट्स त्याला अश्विनने 3 विकेट घेत दिलेली साथ आणि ईशांत शर्माला मिळालेली एकमेव विकेटच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला.
भारतीय संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत असताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने आपल्या फिरकीतील दाखवलेली जादू आणि लीचने त्याला दिलेली साथ याच्या बळावर इंग्लंडने भारतीय संघाचा पहिला डाव 145 धावांत गुंडाळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय संघाला केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीसमोर पुन्हा नांगी टाकली. अक्षर पटेलने पुन्हा पाच विकेट घेतल्या. अश्विनच्या चार आणि वॉशिंग्टनने घेतलेली एक विकेट यांच्या फिरकीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांत गुंडाळला. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रोहित शर्माने षटकाराने भारतीय संघाचा विजय साकार केला.
मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील एक संघ न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल. अहमदाबादमधील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत याचे चित्र स्पष्ट होईल.
* विराटने धोनीचा ‘हा’ विक्रम मोडला
इंग्लंड विरूध्दचा तिसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने जिंकला. विराटसाठी हा विजय खास ठरला. भारतीय मैदानावर कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला. कसोटीत विराटच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा 22 वा विजय ठरला. हा विक्रम आतापर्यंत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने भारतात 21 कसोटीत विजय मिळून दिला होता.