मुंबई : इंधन दरवाढीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या भावामुळे सामान्य नागरिक सध्या वैतागला आहे. महागाईत इंधनदरवाढीचा सामना करताना पुरता त्रस्त झाला आहे. पेट्रोलचे भाव तर सध्या शंभरीवर पोहचले आहेत. पेट्रोलच्या शंभरीनंतर देशभरात याची जोरदार चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर तर मिम्सचा पाऊसच पेट्रोलच्या शंभरीनंतर पडला. यातच एक तरुण पेट्रोल पंपांवर गाडीत पेट्रोल भरताना मोदींना हाथ जोडून नमस्कार करत असलेला फोटो तुफान व्हायरल झाला. यावर संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्या तरुणाचा शोध आता लागला आहे.
पेट्रोलचे भाव शंभर झाल्यानंतर हेल्मेट काढून क्रिकेटमध्ये जसं शतक झाल्यानंतर ते साजरं करतात तसं करण्याचं आवाहन करणारा एक विनोद देखील बराच व्हायरल झाला होता. दरम्यान कालपासून या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये एक तरुण गाडीमध्ये पेट्रोल भरून झाल्यानंतर पंपावर मोदींच्या फोटोला हाथ जोडत आहे. हा फोटो अनेक ठिकाणी आपल्या पाहण्यात आला असेल. चांगलाच वाकून नमस्कार या तरुणाने मोदींना घातला आहे. या व्हायरल फोटोमधील तो तरुण कोण आहे आणि त्याला हा फोटो काढायची कल्पना कशी सुचली, हे पाहूयात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या व्हायरल फोटोमधील तरुणाचे नाव आहे सुरज गंगारामजी खोब्रागडे. सुरज हा यवतमाळ जिल्ह्यातील बोधगव्हानचा रहिवाशी आहे. ३३ वर्षीय सुरजचे बीएचे शिक्षण झालेले आहे. सुरज सध्या संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेत कार्यरत आहे. सुरज संभाजी ब्रिगेडचा यवतमाळ जिल्हाध्यक्ष देखील आहे.
सुरजचा टूर्स & ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे त्याच्या पेट्रोल पंपशी नेहमीच संबंध येतो. एक तर कोरोनाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे सुरजसारख्या लाखोंचे व्यवसाय ठप्प झाले. त्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली. अशातच आता दिवसेंदिवस होणारी पेट्रोल डिझेल भाववाढ चिंतेत भर घालत आहे.
पेट्रोल डिझेल भाववाढीमुळे आमच्या व्यवसायाचे कंबरडे मोडत असल्याचे सुरजने एका वेबसाईटला सांगितले. त्यामुळे जेव्हा तो पंपावरून जातो तेव्हा त्याला मोदींची आठवण येते. मोदीजी तुम्हीच आमच्या व्यवसायांची वाट लावली, अशी सुरजची भावना आहे. यातूनच त्याला ही हाथ जोडून फोटो काढण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले.