पुणे : बारामतीच्या एका रिक्षाचालकाने भररस्त्यात आपल्या मित्रांच्या मागणीवर मराठी लावणीवर ठेका धरत अगदी एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल असं नृत्य सादर करून दाखवलं आहे. आपण आतापर्यंत महिलांना आणि मुलींना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेलं पाहिलं आहे. पण या रिक्षाचालकाने केलेल्या मनमोहून टाकणाऱ्या नृत्याने समाजमाध्यमावर चांगलीच हवा केली आहे. बाबजी कांबळे असे या बारामतीच्या अवलिया रिक्षाचालकाचे नाव आहे.
बारामती शहरात रिक्षा चालवणाऱ्या बाबजी कांबळे यांना नृत्याची आवड आहे आणि ती आवड जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न ते करत असतात. एकदिवस सहकारी मित्रांच्या मागणीवरून रिक्षा स्टँडवरच त्यांनी ‘मला जाऊ दया ना घरी ,आता वाजले की बारा’ या मराठी लावणीवर आपला नृत्याविष्कार दाखवला आहे. बारामतीच्या या कलाकाराची ही अदा महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली आहे. या रिक्षाचालकाने एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल अशी दमदार लावणी सादर केली आहे.
कांबळे यांच्याच मित्रांनी या दरम्यान हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि सोशल मिडियावर शेअर केेले. त्यानंतर बघता बघता त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली. तसेच हा व्हिडिओ संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस पडला.
मुळचे बारामतीला लागुनच असलेल्या गुणवडी गावचे बाबजी कांबळे हे रहिवासी आहेत. तसेच ते गुणवडी गावचे ग्रामपंचायत सदस्यही असल्याचं समजतंंय. सर्वगुणसंपन्न आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून कांबळे यांची ओळख आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या या लावणी व्हिडिओने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलं असून आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातुन लाखो लोकांनी त्यांचा व्हिडिओ पाहुन त्याला पसंती दर्शवली आहे.
* मित्रांच्या फर्माईशीतून कला सादर
खास मित्रांनी केलेल्या फर्माईशीतून कांबळे यांनी त्यांची कला सादर केली. नृत्य सादर करताना मित्रांनीच त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण केले. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. बाबजी कांबळे यांच्या या व्हिडिओच्या फेसबुकवरील पोस्टवर लोकप्रिय ‘लयभारी’ या पेजवर लाईक, कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडिओ महाराष्ट्रातील पसंतीस उतरत असून या लावणी डान्सवर ‘वाहवा’ कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहणाऱ्यांचा संख्या लाखात पोहचली आहे.
* व्हायरल व्हिडीओमधून संदेश
बाबजी कांबळे यांनी नटरंग या मराठी चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबूक आणि इतर सोशल मीडिया वरील ग्रुपमध्ये हा व्हिडीओ शेअर केला जातोय. फेसबूक वापरणाऱ्यांकडून बाबजी यांच्या नृत्याचे कौतुक करण्यात येत असल्याचं दिसते.
कोरोना काळातील संकट आणि मंदी या अशा विविध संकटांनी सामान्य माणसाच्या जीवनात असंख्य अडचणी असताना कष्ट करुन जगणाऱ्या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद शोधतात हे बाबजी कांबळे यांच्या व्हायरल व्हिडीओमधून दिसून येते.