अहमदाबाद : इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 ने जिंकली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 225 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 188 धावाच करू शकला. इंग्लंडकडून बटलर, मलानने अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून भुवनेश्वरने 2 आणि शार्दूलने 3 विकेट घेतल्या.
हिंदुस्थानची टी-20 क्रिकेटमधील विजयी मालिका इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतरही कायम राहिली. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्माची खणखणीत अर्धशतके… भुवनेश्वरकुमार व शार्दूल ठाकूर यांची प्रभावी गोलंदाजी… अन् हार्दिक पांडय़ाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला येथे झालेल्या अखेरच्या लढतीत 36 धावांनी धूळ चारली आणि पाच सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने खिशात घातली.
टीम इंडियाचा संघ मागील आठ टी-20 मालिकांमध्ये अजेय आहे. एकाही मालिकेत पराभूत झालेला नाही. इंग्लंडची विजयी मालिका मात्र खंडित झाली. आठ मालिकांनंतर त्यांच्यावर टी-20 क्रिकेटमध्ये मालिका पराभवाची नामुष्की ओढवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सहा गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय यावेळी टीम इंडियाने घेतला. लोकेश राहुल नसल्यामुळे रोहित शर्मासोबत कर्णधार विराट कोहलीला सलामीला यावे लागले.
पण हा निर्णय पथ्यावर पडला. हिंदुस्थानच्या दोन दिग्गज फलंदाजांनी 94 धावांची दमदार भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मुंबईकर रोहित शर्माने अवघ्या 34 चेंडूंत पाच षटकार व चार चौकारांसह 64 धावांची खेळी साकारली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि जोडी तुटली.
भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा या फॉरमॅटमधला सर्वाधिक स्कोअर होता. या आव्हानाचा पाठलाग करताना मलान आणि बटलर इंग्लंडला जिंकवून देतील, असं वाटत होतं, पण या दोघांची विकेट पडताच इंग्लंडची बॅटिंग गडगडली, त्यामुळे त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रनपर्यंत मजल मारता आली.
या मॅचमध्ये 65 वी रन करताच मलानने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार रनचा टप्पा ओलांडला. 24 व्या इनिंगमध्येच मलानने हे रेकॉर्ड केलं. मलानच्या आधी हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर होता. बाबर आझमने 26 इनिंगमध्ये आणि विराट कोहलीने 27 इनिंगमध्ये 1 हजार रनचा टप्पा पार केला. केएल राहुल आणि एरॉन फिंच यांनी प्रत्येकी 29-29 इनिंगमध्ये 1 हजार रन पूर्ण केले.