कोल्हापूर : कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे रुग्णालय परिसरात गावठी बॉम्ब आढळून आला. डॉ. सतीश पाटील यांचे पायोस नावाचे रूग्णालय आहे. या रूग्णालयाच्या परिसरात पोत्यात काहीतरी भरून तेथे टाकले होते. स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना त्या पोत्यातून टिक-टिक असा आवाज आला होता. कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवले. दरम्यान, पोलीस आणि बॉम्ब शोध पथकाने तो निकामी केला आहे. हा आज रविवारी घडला.
एका हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी आज रविवारी हाणून पाडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पायोस हॉस्पिटलमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जयसिंगपूर पोलिस व बॉम्ब शोध पथकाने हा गावठी बॉम्ब निकामी केला. बॉम्ब शोध पथक आल्यानंतर घटनास्थळाच्या अजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.
याबाबत डीवायएसपी रामेश्वर वैजाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली-कोल्हापूर मार्गावरील डॉ.सतीश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊडलगत गुरूवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुरूवारी (ता. १८) रोजी पायोस हॉस्पिटलच्या कंपाऊड लगत ठेवण्यात आलेला गावठी बाँम्ब रविवारी टायमर वाजल्यानंतर लक्षात आला. ही बातमी जयसिंगपूर शहरात व परिसरात वार्यासारखी पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. तर या परिसरात हजारो नागरीकांनी बघ्याची गर्दी केली होती. हा गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी ही गर्दी पांगवली.
* टायमर वाजल्यानंतर आले लक्षात
सिक्युरिटी गार्डने हे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. रविवारी सकाळी हॉस्पिटलचा कर्मचारी झाडू मारताना या पोत्याला स्पर्श झाला. त्यामुळे या पोत्यातून टिक-टिक असा टायमरचा आवाज येवू लागला. हॉस्पिटमधील कर्मचारी भरत पाटील यांनी तत्काळ या पोत्यामध्ये पाहिले असता. प्लॉस्टिकच्या पाईप्स्, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले. तर या पोत्यामधून बराच अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. त्यानंतर पाटील यांनी हॉस्पिटलच्या लगत असणार्या मोकळ्या जागेत हे पोते फेकून दिले. ही माहिती पाटील यांनी तत्काळ डॉ.सतीश पाटील व जयसिंगपूर पोलिसांना दिली.
* एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावठी बाँम्ब निकामी
तत्काळ कोल्हापूर येथील बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर अगदी काही वेळेतच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर यंत्रणेनेने सुरक्षितरित्या पहाणी करून यंत्रणेच्या सहाय्याने तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावठी बाँम्ब जागेवरच निकामी केला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
यावेळी बॉम्ब शोध व नाश पथकातील हेड कॉन्स्टेबल मानसिंग पाटील, विनायक लाटणे, मुस्ताक शेख, पोलिस नाईक जयंत पाटील, अशिष मिठारे, जीवन कांबळे, रवि पाटील, विनायक डोंगरे, ‘मर्फी’ श्वान यांनी जागेवरच नष्ट केलेल्या बाँम्बचे साहित्य पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. दरम्यान जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस नाईक गुलाब सनदी, अभिजित भातमारे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे यांच्यासह पोलिस पथकाचा समावेश होता.