पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करुन तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केल्याची घटना घडलीय.
अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे़ तर, लाच घेताना जानेवारीमध्ये खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) हिला लाच लुचपत प्रबिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली आहे.
अर्चना जतकर यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार अर्चना जतकर या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी शरण आल्या. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जतकर व इतर आरोपी यांनी यापूर्वी कट रचून आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास करायचे असल्याचे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ६ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस आयुक्त सिमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.
* तब्बल १४७ वेळा संपर्क करुन संभाषण
अर्चना जतकर – शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संपर्क करुन संभाषण केले आहे. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करुन देते असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे सभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देते असे म्हणून संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे.
* सीमकार्ड दुस-याच्या नावावर
न्यायाधीश जतकर यांनी आरोपीसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीमकार्ड हे मुंबईतील समता कुबडे यांच्या नावावर आहे. त्यांनी जतकर यांना दोन सीमकार्ड दिले आहेत. दुसरे सीमकार्ड जतकर यांनी कोणाला दिले याचा तपास करायचा आहे.
जतकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी भानुदास जाधव याला एकूण १८ कॉल केले असून सुशांत केंजळे याला ४ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.