अभिनेता ते नेता असा रजतपट ते संसदगृहापर्यंतचा प्रवास करणारे सुनील दत्त यांचा आज स्मृतिदिन.
सार्वजनिक आयुष्यात व व्यक्तिगत जीवनातही अनेक वादळांशी सामना करत जगलेले सुनील दत्त ह्रदयविकाराने निधन पावले तेव्हा ते भारत सरकारात मंत्री होते.
पूर्व पंजाबातील (आता पाकिस्तान) झेलम प्रांतात ६ जून १९३०ला बलराज दत्त म्हणून ते जन्माला आले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून भारतात आले, तेव्हा ते १७ वर्षांचे होते.
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर ते सुनील दत्त बनले. आकर्षक पंजाबी शरीरयष्टी व रुबाबदार चेहरा यामुळे ते सुरुवातीपासूनच लोकप्रिय हिरो ठरले.
‘साधना’, ‘सुजाता’, ‘वक्त’, ‘मेरा साया’, ‘मिलन’ या सारखे विविध घाटणीच्या लोकप्रिय चित्रपटांत भूमिका करणाऱ्या सुनील दत्त यांनी १९५७मध्ये ‘मदर इंडिया’त तेव्हा यशाच्या शिखरावर असलेल्या नर्गीस यांच्याबरोबर भूमिका केली व पुढील वर्षी त्यांच्याशीच ते विवाहबद्धही झाले.
नर्गीस दत्त यांनी रुपेरी पडद्याला राम राम ठोकून पत्नी व आईच्या भूमिका स्वीकारल्या व मुले मोठी झाल्यावर त्या राजकीय जीवनात येऊन खासदारही झाल्या. पण त्यांना कर्करोगाने ग्रासले व त्यातच १९८१ मध्ये त्यांचे निधन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर सुनील दत्त सार्वजनिक जीवनात व नंतर राजकारणात आले आणि लोकसभेचे सदस्यही बनले. याच काळात त्यांचा मुलगा संजय दत्त वेगवेगळ्या वादांमुळे गाजत होता. ते खासदार असतानाच संजयला विनापरवाना घातक शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झाल्याचे पाहण्याचेही त्यांच्या नशिबी आले.
तरीही राजकारणात ते टिकले व २००४ मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारात युवा कल्याण व क्रीडामंत्री झाले. पण त्यांना ह्रदय विकाराने ग्रासले व त्यातच मुंबईत त्यांचे २००५ ला आजच्या दिवशी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
सुनील दत्त यांनी केलेल्या अनेक चित्रपटांतील विविध भूमिका प्रसिद्ध असल्या तरी ‘पडोसन’मध्ये किशोर कुमार, सायरा बानो, मेहमूद, मुक्री, क्रॅस्टो आदींच्या बरोबरीने त्यांनी साकारलेला ‘भोला’ मात्र रसिकांच्या कायम स्मरणात राहील. त्यातील ‘मेरे सामनेवाले खिडकी में एक चांद का टुकडा रहता है’ किंवा ‘कहना है आज यें तुमसे पहिली बार’ ही गाणी आजही तरुणांच्या प्रेमभावनेचा उद्गार बनलेली आहेत.
– भारतकुमार राऊत