मुंबई : पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला काल रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर आता आणखी एकाला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायन थॉर्पया असे आरोपीचे नाव आहे. राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
या प्रकरणात एक व्हॉट्सअॅप चॅटही आता समोर आले आहे. त्यामध्ये पैशाच्या हिशोबाचा उल्लेख आहे. याआधी या प्रकरणात एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. भारतातील काम पाहणारा उमेश कामत यालाही अटक केलीय. आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म बनवणाऱ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. याअगोदरही आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते. यात मोठी नाच्चकी झाली होती.
* काहीजण जामीनावर सुटले
राज कुंद्राला अटक झाल्याच्या बातमीपेक्षाही अटकेच्या पॉर्न फिल्म्सने सगळीकडे खळबळ उडाली. एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात तयार केल्या जाणाऱ्या पॉर्न फिल्म्स निर्मितीचे धागेदोरे थेट एका उद्योगपतीपर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ११ जणांना अटक केली. यातील काही जण जामीनावर सुटले. प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना या Porn apps चा मुख्य सुत्रधार राज कु्ंद्रा असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाताला लागले आणि पोलिसांनी राजला बेड्या ठोकल्या.
* २०२१ मध्ये पॉर्न फिल्म्सचा पर्दाफाश
मूळात या पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि प्रदर्शन उद्योगाचा २०२१ च्या फेब्रुवारीत पर्दाफाश झाला होता. चमचमत्या बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवण्याची स्वप्न बघत मुंबईत येणाऱ्या तरुणींना हे पॉर्न फिल्म्स निर्मिती करणारे जाळ्यात अडकवायचे. बॉलिवूड चित्रपटात संधी देतो असे सांगून त्यांना अश्लील चित्रपटात करण्यास भाग पाडायचे आणि नंतर हे चित्रपट Porn apps च्या माध्यमातून आणि वेबसाईटवरून देशात आणि परदेशात वितरित करायचे.
* लाखो रुपयांची कमाई
Porn apps पैकी एक हिटहॉट नावाचं अॅप होतं. हे पोलिसांच्या तपासात समोर आलं. मालाड पश्चिममधील मढ गावात पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांनी एक बंगला भाड्याने घेतला. तिथे या पॉर्न चित्रपटाचं चित्रीकरण केले जात होते. या व्हिडीओच्या माध्यमातून कंपनी लाखो रुपये कमवायची. इतकंच नाही, तर या प्रकरणातील आरोपी या चित्रपटांचे ट्रेलर सोशल मीडिया साईटवरही पोस्ट करायचे. हे सर्व बिनदिक्कतपणे चालू असताना मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेल विभागाला खबऱ्याने या उद्योगांची माहिती दिली.
* पॉर्न चित्रपटाचं शुटिंग सुरूच असतानाच टाकली धाड
मालाड पश्चिमेला असलेल्या मढ गावात एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात पॉर्न चित्रपटांचं शुटिंग केलं जात असल्याचं कळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. पथकाने धाड टाकली. पोलिसांचं पथक दाखल झालं तेव्हाही पॉर्न चित्रपटाचं शुटिंग सुरूच होतं. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. हॉटहिट अॅप्सवर हे चित्रपट प्रदर्शित केले जाता हे सुद्धा पोलिसांच्या चौकशीत उघड झालं.
* अभिनेत्रीसह यांना केली अटक
या प्रकरणात ‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठ या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली. ती व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याचंही समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन, दीपंकर खासनवीस, प्रतिभा नलावडे, मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर, वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ, उमेश कामत, दीपंकर खासनवीस यांना अटक केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अभिनेत्री पाठवायची कंपनीला पॉर्न फिल्म्स
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एकएक माहिती हाती लागत गेली. रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉहीट ही वेबसाईट आणि अप्स तयार केलं होतं. यात दीपंकर हा सहसंचालक होता. याच अॅप्स आणि साईटवरून ते पॉर्न चित्रपट प्रदर्शित करायचे. तर अभिनेत्री गहना वशिष्ठ परदेशातील कंपनीला पॉर्न फिल्म्स पाठवायची. पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून पैसे कमवायची. याची चौकशी सुरू असताना गहनाचं भारतातील काम पाहणारा उमेश कामत पोलिसांच्या हाताला लागला.
* चौकशीला बोलावले अन थेट ठोकल्या बेड्या
अटकेत असलेल्या राज कुंद्रा अर्थ साहाय्य करत असलेल्या एका स्टार्ट अपमध्ये उमेश कामत व्यवस्थापकीय संचालक आहे. उमेश कामतच्या अटकेनंतर पोलिसांचा तपासराज कुंद्रा याच्या दिशेला सरकला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्रा यांच्या सहभागाबद्दल तपास सुरू केला. यात पोलिसांच्या हाती बरेच पुरावे लागले, ज्यातून राज कुंद्रा हेच या संपूर्ण पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि Porn apps चे सूत्रधार असल्याचं पोलिसांना दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना काल सोमवारी रात्री (१९ जुलै) चौकशीसाठी बोलावलं. चौकशीनंतर राज कुंद्रा यांना बेड्याच ठोकण्यात आल्या. त्यानंतर ही बातमी वा-यासारखी व्हायरल झाली.
* अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप
राज कुंद्राच्या अटकेची बातमी व्हायरल झाल्यानंतर मॉडेल सागरिका सोना सुमन हिने एक धक्कादायक माहिती दिलीय. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला आहे.
या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.
* होऊ शकतो ५ वर्षांचा तुरुंगवास
व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लीलतेचा आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारं साहित्य तयार करणं वा इतरांना पाठवणं पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणंही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणंही गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.