नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं आणि पिकाचे मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारनं एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन मोदी सरकारनं राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर केले आहे.
याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच अधिवेशनात विरोधकांनी पेगॅसस प्रोजेक्ट अहवालावरून जोरदार घोषणाबाजी केली.
आजही लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू होता. याच अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. केंद्रानं राज्याला ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी ३ हजार ७२१ कोटींची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेऊन ४ हजार ३७५ कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केलं. राज्यानं केलेल्या ३ हजार ७२१ कोटी रुपयांच्या मागणीपैकी ७०० कोटी रुपये मदत देण्याचं आज केंद्र शासनानं घोषित केलं आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अधिवेशनातील कामकाजात अडथळा आणत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला. काँग्रेस पक्षाला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचं कामकाज चालू देत आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर भाजपा नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस सभागृहाचं कामकाज चालू देत नाही, तसंच लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही हजर राहत नाही,” असं मोदी यावेळी म्हणाले.