अकलूज : उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, यावर ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले होते. मात्र ग्रामस्थांशी व वरिष्ठ नेते मंडळींशी चर्चा झाल्यानंतर अंतिम नोटिफिकेशन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची घोषणा उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
तब्बल ३६ दिवसांपासून अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया लोकातून ऐकावयास मिळत आहेत. उच्च न्यायालयाने या संदर्भात तीन आठवड्यांची मुदत राज्य सरकारला दिली असून उपोषण मागे घ्यावे यासाठी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती, मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अंतिम नोटिफिकेशन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. २२ जून पासून अकलूज येथील प्रांतकार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे .उपोषणाच्या ३५ व्या दिवशी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना शिवतेजसिंह म्हणाले , मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास तिन आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचा आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती .
परंतु गावातील नागरीकांशी चर्चा केल्यानंतर जोपर्यंत अंतिम नोटीफिकेशन निघत नाही तो पर्यंत उपोषण सुरू ठेवावे असा निर्णय सर्वांनीच घेतला असल्याचे ऐकायला मिळाले . त्यानुसार साखळी उपोषण सुरूच राहणार असून उच्च न्यायालयापुढे सादर होणाऱ्या शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा असल्याचे शिवतेजसिंह यांनी सांगितले. ३६ व्या दिवशी बहुसंख्येने ग्रामस्थ आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.