सोलापूर : पंढरपूर शहर आणि परिसरात वाळू चोरी, खंडणी, विनयभंग, चोरी आणि बेकायदेशीर दारूची विक्री आदी गंभीर गुन्ह्यात दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सात जणांना पंढरपूर परिसरातून हद्दपार करण्याचा आदेश आज ग्रामिण पोलीसांच्या वतीने जारी करण्यात आला आहे. त्यापैकी एकास दोन वर्षे तर अन्य सहा जणांना प्रत्येकी एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
ग्यानबा दिपक धोत्रे (रा.जुनी वडार गल्ली, पंढरपूर) याला दोन वर्षाकरिता पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस तालुका परिसरातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले. त्याच्या विरुद्ध ३ वाळू चोरीचे गुन्हे पोलिसात दाखल आहेत .
* एक वर्षाकरीता हद्दपार
तानाजी गोविंद कांबळे ( रा.लक्ष्मीटाकळी ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध खंडणी, विनयभंग आदी तीन गुन्हे दाखल. सिकंदर चंद्रकांत कोळेकर( रा.नेपतगाव ता.पंढरपूर) याच्याविरुद्ध चोरीचे तीन गुन्हे दाखल. तानाजी कैलास खंडागळे (रा.उंबरगाव ता. पंढरपूर) याच्या विरुद्ध दारू विक्रीचे तीन गुन्हे, समाधान सुखदेव ढवळे (रा. पिराचीकुरोली पंढरपूर) याच्या विरुद्ध वाळू विक्रीचे चार गुन्हे, दिलीप कृष्णा गायकवाड (रा. सोनके ता. पंढरपूर) याच्या विरुद्ध दारू विक्रीचे चार गुन्हे तर आकाश रामदास शिंदे ( रा. भंडीशेगाव ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध दारू विक्री आणि जबरी चोरीचे असे एकूण पाच गुन्हे दाखल आहे. या सर्वाना एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत आदींनी केली आहे.
* मंद्रुपच्या खासगी सावकारावर गुन्हा
पुंडलिक विठ्ठल माने (रा.मंद्रूप ) यांनी कपड्याच्या व्यवसायासाठी सिद्धाराम पाटील यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. सिद्धाराम पाटील यांनी पुंडलिक माने यांच्याकडून घेतलेल्या मूळ रक्कम दोन लाखांपोटी आतापर्यंत व्याजासह परत केली. नंतर रक्कम व्याजासहित दिल्यानंतर त्यांनी कोरे चेक आणि बॉण्ड परत करण्याची मागणी केली. यावर सिद्धाराम पाटील यांनी आणखी व्याजासह पाच लाख ६० हजार रुपये दिल्याशिवाय चेक मिळणार नसल्याचे सांगितले. फिर्यादीच्या दुकानात येऊन वारंवार त्रास दिला, अशी फिर्याद पुंडलिक माने यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार सिद्धाराम पाटील यांच्याविरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलीस महिंद्रकर अधिक तपास करीत आहेत.