पुणे : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी (१ ऑगस्ट ) महसूल दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.
डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल,नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.
यावेळी, ‘सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,’ थोरातांनी नमूद केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. १ ऑगस्टपासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा करुन देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे देखील थोरात यांनी नमूद केलं.
‘ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.