उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी (वय 90)यांचं आज सोमवारी (ता. 2 अॉगस्ट) पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. 1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मराठवाड्याचे साने गुरुजी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पूर्ण मराठावाडा शोक व्यक्त करत आहे.
6 सप्टेंबर 1932 रोजी आलुरे गुरुजी यांचा जन्म झाला होता. बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू होऊन तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून 1990 साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर व त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत 28 शाळा सुरु केल्या आहेत.
शिक्षकाची नोकरी लागल्यापासून 25 टक्के पगार ते गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत. शिक्षक व आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनची रक्कमही त्यांनी दलित मुलांसाठीच दिली. मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे सुरु करुन शिक्षण उपलब्ध करुन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात ते सहभागी होते. तुळजापूरला अभियांत्रिक कॉलेज उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती.
शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरु होते. शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा मोठा गौरवही झाला होता. मराठवाड्यातला दुष्काळ असो वा राष्ट्रीय आपत्ती असो आलुरे गुरुजी आणि त्यांच्या शाळेची आपदग्रस्तांना नेहमी मदत करत असे. त्यांच्या निधनाने पूर्ण मराठावाडा शोक करत आहे.