अकलूज : खंडाळी (ता.माळशिरस) येथील राजश्री लक्ष्मणराव माने हिची महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्याचे पत्र 12 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे.
केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरु करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार असे पुरस्कार जाहिर करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी खंडाळी येथील रहिवासी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी, बारामतीमध्ये शिकत असणाऱ्या राजश्री लक्ष्मणराव माने हिची निवड करण्यात आली. रूपये दोन हजार व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माने हिने प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली येथे परेडमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे नेतृत्व करीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याचबरोबर माने हिने राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय सहभाग घेवून विविध सामाजिक मोहीम व कार्य आणि प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. या पुरस्कारामुळे तिचे माळशिरस तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.