सोलापूर : दागिने दुरुस्त करण्यासाठी व राखी खरेदी करण्यासाठी गेल्यावर अनोळखी तीन महिलांनी एका आजीची नजर चुकून तिच्या पर्समधील सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी अतिष ज्ञानोबा शिरगिरे (वय-३०,रा. सिद्धेश्वर सोसायटी,मड्डी वस्ती,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अतिष यांची आजी गजराबाई व आई प्रभावती शिरगिरे या गणेश रामचंद्र आपटे या ज्वेलर्स दुकानांमध्ये दागिने दुरुस्त करण्यासाठी व राखी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी तीन अनोळखी महिलांनी फिर्यादीची आजी गजराबाई यांची नजर चुकवून त्यांच्या काखेतील पर्समधून १ लाख ६० हजार रुपयांचे चार तोळे वजनाचे सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.
* ज्वेलर्स दुकान फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
सोलापूर – न्यू आर बी नंदाल या नावाचे ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान साखर पेठ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी रेनॉन बालाजी नंदाल (वय-३८,रा. जोडभावी पेठ,कन्या चौक,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फिर्यादी यांचे न्यू आर बी नंदाल नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. त्यांच्या दुकानात कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोल्डिंग लाकडी दरवाजाला बाहेरून लावलेले कुलूप,कडी कापून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील चार लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, एक लाख ४० हजार रुपये किमतीचे चार तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे तयार दागिने व ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा मिळून एकूण सहा लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोनि राऊत हे करीत आहेत.
* औषधे खरेदी करताना तरुणीचा पळविला मोबाईल
सोलापूर – सात रस्ता येथील मेडिकलमध्ये औषधे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सात रस्ता हुमा मेडिकल सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी प्राची चंद्रभान काले (वय-२२,रा. होटगी नाका, सीनियर मेडिकल गर्ल्स हॉस्टेल, सोलापूर) हिने सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सात रस्ता येथे प्राची ही औषधे खरेदी करीत होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने प्राची हीचा १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक भोई हे करीत आहेत.