मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा बेल बॉटम सिनेमा अडचणीत आला आहे. सौदी अरब, कतार आणि कुवेतमध्ये या सिनेमावर बंदी घातली आहे. यात भारतीय अधिकाऱ्यांना नायक दाखवण्यात आले आहे. या विमान अपहरण कर्त्यांना पकडण्यासाठी संयुक्त अरब अमिरातचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी प्रयत्न केले होते. याचा कुठेही उल्लेख नसल्याने मध्य पूर्वेतील देशांमधील सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप नोंदवला आहे.
वासू भगनानी आणि रंजीत एम तिवारी यांची निर्मिती असलेला ‘बेल बॉटम’ हा सिनेमा खरे तर गेल्याच वर्षी चित्रीत झाला होता. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत होतं. या आठवड्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मनोरंजन विश्वावर झाला आहे. देशभरातले चित्रपटगृह बंद होते. यामुळे अनेक मोठ्या बॅनरचे सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत. परंतु आता परिस्थिती सुधारत असल्याने थिएटरही सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बेल बॉटम हा पहिला बिग बजेट सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही या सिनेमाचे कौतुक केले आहे. मात्र, सौदी अरब, कतार आणि कुवेतमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेल बॉटम सिनेमाच्या मध्यंतरानंरच्या भागामध्ये अपहरण करणारे विमान लाहोरहून दुबईला घेऊन गेलेले दाखवले आहेत. १९८४ मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. यावेळी संयुक्त अरब अमीरातचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी व्यक्तिगत पातळीवर ही गोष्ट हाताळली होती. तसेच संयुक्त अरब अमीरातीच्या अधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांना पकडले होते.
सिनेमात या घटेनेला भारतीय अधिकाऱ्यांना नायक म्हणून दाखवले आहे. सिनेमाचा नायक अक्षय अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी रणनिती आखतो परंतु याची कल्पना तो संयुक्त अरब अमीरातीच्या संरक्षण मंत्र्यांना देत नाही असे दाखवले आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील देशांमधील सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप नोंदवत या सिनेमावर बंदी घातली आहे.
दरम्यान, भारत आणि अन्य देशांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. परंतु महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ राज्यांतील थिएटर्स अजूनही बंदच असल्याने हा सिनेमा तिथे रिलीज होऊ शकलेला नाही. अक्षय कुमार अभिनीत बेलबॉटम हा सिनेमा १ हजार ६०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. म्हणजे एका दिवशी प्रत्येक स्क्रीनवर तीन शो लावले जात आहेत.