मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील बंगला जमीनदोस्त करण्यात आला. परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.
किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्या तोडकामाचा व्हिडिओ ट्विटरवर समाज माध्यमावर शेअर केला आहे. ‘करून दाखविले, पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा’, असंही सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘उद्या मी स्वत: दापोलीला जाऊन तोडकामाची पाहणी करणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला शिवसेनेचे सचिव नार्वेकर यांचा बंगला अखेर जमीनदोस्त झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडं तक्रारी करून कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर नार्वेकर यांनी स्वत:च अनधिकृत बांधकामाचं पाडकाम सुरू केल्याचं कळतं. नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक व अत्यंत विश्वासू शिलेदार असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.