सोलापूर : सोलापुरातील शेळगी परिसरातील मित्र नगर येथे आज सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली.मुलाने आईला लोखंडी फुकारीने डोक्यात,कपाळावर मारून खून केला आहे. याबाबत संशयित आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.अतुल एकनाथ कोळेकर (वय-३०,रा.मित्र नगर शेळगी सोलापूर) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेळगी परिसरातील मित्र नगर येथे राहणाऱ्या वंदना एकनाथ कोळेकर (वय-४८, रा.मित्र नगर,शेळगी, सोलापूर) यांच्या कपाळावर,डोक्यावर लोखंडी फुकारी मारून मुलगा अतुल कोळेकर याने खून केला आहे. याप्रकरणी मयत वंदना कोळेकर यांचा मुलगा अतुल कोळेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक करणकोट हे करीत आहेत.
डोक्यावर कपाळावर जबर जखमा झाल्याने जागेवरच मृत्यू पावल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून,घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलिस अधिकारी जमा झाले होते. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून,अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे. मुलाने आईचा खून का केला असावा याचे कारण नेमके काय आहे हे अद्याप पर्यंत समजू शकले नसून,याचे कारण अस्पष्ट आहे.
* टेलरचा मोबाईल चोरट्याने हिसकावला
सोलापूर : टेलर आपल्या मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून अज्ञात चोरट्याने मोबाईल हिसकावून चोरून नेल्याची घटना शनिवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सैपन रमजान इनामदार (वय-३१,रा.बिस्मिल्ला नगर, मुळेगाव रोड,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सैपन कन्ना चौक येथून घरी जात होते. त्यावेळी त्यांची मोटारसायकल अचानक पंचर झाल्याने त्यांच्या मित्राला फोन लावून हैदराबाद रोड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात समोर मोबाईलवर बोलत असताना फिर्यादीच्या पाठीमागून एका अनोळखी इसमाने चालत येऊन त्यांच्या कानाला लावलेला ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळवून नेला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई दाईंगडे हे करीत आहेत.
* घटस्फोटाचा राग मनात धरून मारहाण
सोलापूर : मुलाच्या घटस्पोटाचा राग मनात धरून चाकू व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना शनिवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोणगाव येथे घडली. याप्रकरणी रेवणसिद्ध रायप्पा पुजारी (वय-६७, रा.मु. पो. तेलगाव,उत्तर सोलापूर, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शशिकांत जनार्धन खांडेकर (वय-५५) व तुषार शशिकांत खांडेकर (वय-२२,रा.दोघे राहणार डोणगाव, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी शशिकांत खांडेकर व तुषार खांडेकर यांनी संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलाच्या घटस्फोटाचा राग मनात धरून फिर्यादी रेवणसिद्ध पुजारी यांना चाकू व लोखंडी गजाने दुखापत करून शिवीगाळ केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास गायकवाड हे करीत आहेत.
* लग्नाच्या खर्चावरून लोखंडी सळईने मारहाण
सोलापूर : लग्नाच्या खर्चाच्या कारणावरून लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना रविवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डोणगाव येथे घडली. याप्रकरणी शशिकांत जनार्दन खांडेकर (वय-५५,रा.डोणगाव,सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रेवणसिद्ध पुजारी (वय-५८) शिवलिंग पुजारी (वय-४५) व कुमार पुजारी (वय-४८) (तिघे रा. तेलगाव,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शशिकांत खांडेकर यांना वरील संशयित आरोपी यांनी संगणमत करून लग्नाचा खर्च देण्याच्या कारणावरून फिर्यादी शशिकांत यांना लोखंडी सळईने मारहाण करून दुखापत केली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक घाटे हे करीत आहेत.