सोलापूर : सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बढतीवर बदली झाली असून नवीन पोलीस आयुक्त म्हणून मूळचे सोलापूरचे दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या ठाणे येथे कार्यरत होते. काल सोमवारी रात्री उशिरा हे आदेश निघाले. अंकुश शिंदे यांनी चांगली कामगिरी केली होती. शहरवासियांनी त्यांना समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने रात्री उशिरा राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील अनेक दिवसांपासून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा ऐकण्यास मिळत होती. निश्चित त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळेल अशी चर्चा होती त्या प्रमाणे त्यांना बढती मिळाली आहे.
नवे आयुक्त दत्तात्रय कराळे हे सोलापुरातील उत्तर तालुक्यातील देगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे. ते मूळचे सोलापूरचे असल्याने शहरवासियांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.