नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. गाड्यांच्या हॉर्नमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम बनवले जाणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. तसेच हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हायोलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. हे नियम थेट वाहननिर्मात्या कंपन्यांसाठी असणार आहेत.
देशात वायू प्रदूषणांचा वाढता स्तर लक्षात घेता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यासंदर्भात मोठा निर्णय घेणार आहेत. वाढणाऱ्या वायू प्रदुषणाकडे एक जबाबदार नागरिक म्हणून लक्ष न देता अनेक जण मोठ्या आवजाचे हॉर्न गाडीला लावतात. तसेच बऱ्याचदा निष्काळजीपणाने हॉर्न वाजविल्याने अपघात होण्याची शक्यताही अधिक असते.
यावर तोडगा म्हणून केंद्रीय वाहतूक मंत्रालय हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्या जागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार आहे. मंत्रालयाकडून लवकरच या बाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमात दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुमच्या आजूबाजूला भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज ऐकायला मिळाला तर नवल वाटू देऊ नका.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच भारतीय वाद्यांचे सूर हॉर्नमध्ये ऐकायला मिळणार आहे. भारतीय वाद्य ज्यामध्ये, तबला, पेटी, तानपुरा, बासरीचे सूर हॉर्नमधून ऐकू येणार आहेत. त्यामुळे प्रवास करताना आता तुम्हाला गर्दीत कर्णकर्कश आवाज ऐकू न येता मधूर संगीत येत्या काही दिवसात ऐकायला मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या वाहने भंगारात काढण्याच्या धोरणामुळे अनेकांच्या मनात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे, हे स्पष्ट केले होते. यासह जुन्या वाहनांमुळे काय कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, कोणते धोके आहेत हे गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केल्यानंतर केंद्र सरकार पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे.
* गडकरींच्या मनात कसा आला विचार
मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खासगी अनुभवाचा संदर्भ देत त्यांच्या मनात हा विचार आला आहे. गडकरी नागपूरमध्ये ११ व्या मजल्यावर राहतो. तिथे रोज सकाळी ते एक तास प्राणायाम करतो. मात्र सकाळची शांतता गाड्यांच्या हॉर्नमुळे भंग होते. हा त्रास झाल्यानंतर गडकरींनी यासंदर्भात विचार केला. गाड्यांचे हॉर्न हे ऐकण्यासाठी योग्य पद्धतीचे असले पाहिजेत असा विचार मनात आला. त्यामधूनच आता गाड्यांच्या हॉर्नचे आवाज हे भारतीय वाद्यांचे असावेत, असा विचार आम्ही सुरु केला असून त्यासंदर्भात काम सुरु आहे, असं गडकरी म्हणाले.