बार्शी : नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र रसाळ यांचा पुतण्या विक्रांत सुधीर रसाळ यास मॉर्निगवॉकसाठी गेल्यानंतर जबरदस्तीने पळवून नेवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना सुभाषनगर भागात घडली आहे. याबाबत जखमीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविराधात गुन्हा दाखल झाला आहे.
विक्रांत रसाळ कॅन्सर हॉस्पिटलजवळील वाणी प्लॉट मधील रहिवाशी आहेत. सुभाष नगर भागातील रिंगरोड येथील गारवा हॉटेल ते चालवितात. ते दररोज पहाटे 5 च्या सुमारास घराजवळील रस्त्यावर फिरण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे ते पहाटे 05/15 वाजण्याचे सुमारास फिरण्याकरिता घराबाहेर पडले, परंतु नेहमीच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साठलेले असल्यामुळे ते मुख्य रस्त्यावर येवून सुभाषनगर कडे निघाले.
रस्त्यावरील गुळमिरे यांचे शाळेसमोर आले असता अचानक पाठीमागून पाच इसम आले. त्यांनी हात-पाय पकडून उचलून त्यांना रस्त्यापलीकडे सुमारे 400 फूट अंतरावर असलेल्या बुटे यांच्या शेतात नेले. यावेळी त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने त्यांच्या तोंडात कुकरी घातली. तेथे त्यांना पालथे झोपवून दोन्ही हात व पाय दोरीने बांधले. त्यानंतर एक इसम तोंडावर बसला व दुसरा पायावर बसला. त्यातील एका इसमाने हातोड्यासारख्या हत्याराने त्यांच्या कंबरेवर मारणेस सुरवात केली. तेव्हा ओरडण्याचा प्रयत्न केला असता कापडी बोळा तोंडात कोंबला.
त्यानंतर कंबरेवर मारत असताना जीवाच्या भीतीने सर्व शक्ती पणाला लावुन त्यांनी जोरात हिसका दिला. त्यावेळी एका इसमाने डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने हातोडा मारला. परंतु तो डोकीत न बसता डाव्या कानाजवळ जमिनीवर आदळला. त्याचवेळी तोंडातील बोळा निसटून पडल्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला.
त्यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक सावध झाल्याचे पाहून पाचही जण जामगाव रस्त्यावरील ताटे यांच्या शेतामधून पळून गेले. आरोपीनी काळ्या रंगाचा ट्रकसुट घातला होता व डोळे सोडुन सर्व चेहरा झाकणारे मास्क घातलेले होते. नंतर त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
*ओबीसी मेळाव्याप्रकरणी माजी महापौरांसह१५ जणांवर गुन्हा
सोलापूर : शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून व विनामास्क सोशल डिस्टन्स न ठेवता जास्त वेळ ओबीसी भटके-विमुक्त निर्धार मेळावा घेतल्याप्रकरणी पंधराजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोजक जिल्हा ओबीसी व्ही.जे.एन.टी संघर्ष समन्वयक समिती सदस्य शरद कोळी,भोजराज पवार, हसिफ नदाफ, युवराज चुंबळकर, भारत जाधव, सादिक कुरेशी, संजय जोगीपेटकर, अशोक इंदापुरे, संदीप राठोड, नलिनीताई चंदेले, माधुरी पारपल्लीकर,अॅड. राजन दिक्षित,अलकाताई राठोड, आनंद सिंगराल, लक्ष्मण भोसले (सर्व.रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जुळे सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्यालयाच्या समोरील गंगा लॉन्स येथे दि. ३१ ऑगस्ट रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान भटक्या विमुक्त मुक्ती दिनानिमित्त आयोजित ओबीसी भटके-विमुक्त निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता आदेशाचे उल्लंघन करून विना मास्क सोशल डिस्टन्स न ठेवता दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कार्यक्रम सुरू ठेवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे, अशा आशयाची फिर्याद पोसई बालाजी मच्छिंद्र मस्के यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाल्मिकी हे करीत आहेत.
* ध्वजारोहण कार्यक्रम पडला महागात, सात जणांवर गुन्हा
सोलापूर : आदेशाचे उल्लंघन करून मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास कवी जाधव, नागनाथ मनोहर गायकवाड,पवन शरदचंद्र गायकवाड,भारत माणिक जाधव,महेश मुरलीधर काळे, शंकर रखमाजी जाधव, संजय पांडुरंग गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडील मनाई आदेश असताना वरील संशयित आरोपींनी १६० ते १७० लोकांना बेकायदेशीररीत्या एकत्रित बोलावून दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम केला. या कार्यक्रमात एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्स न ठेवता आदेशाचे उल्लंघन करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे.अशा आशयाची फिर्याद पोलीस नाईक इम्रान बशीर शेख यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक कुंभार हे करीत आहेत.