नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात भारताचा प्रमोद भगत आणि ब्रिटनचा डॅनियल बेथल यांच्यात अंतिम सामना रंगला होता. यात भारताच्या प्रमोद भगतने बाजी मारली. प्रमोदने गोल्ड मेडल जिंकले आहे.
मनोज आणि दायसुके यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा होत होता. पहिला सेटतर अगदीच अटीतटीचा झाला. त्यामध्ये मनोजने 22-20 च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मनोजने सुरुवातीपासून वर्चस्व मिळवून ठेवलं आणि सामना 21-13 च्या फरकाने जिंकत कांस्यपदक पटकावलं.
मनोज सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र तरीदेखील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने पुनरागमन करत दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने विजय मिळवत कांस्य पदक जिकंलं आहे. त्याने जपानच्या दायसुके फुजिहाराला मात देत कांस्य पदक मिळवलं. तर दुसरीकडे प्रमोद याने आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यात पोहचताच त्याने किमान रौप्य पदक निश्चित केलं होतं. मात्र अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताने बॅडमिंटनमध्ये आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे.
पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे. 22 वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने 21-10 ने तर दुसरा 21-11 ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.