रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडिल नंद कुमार बघेल ( वय ८६ ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांची रायपूर कोर्टाने १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नंद कुमार बघेल यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात अपमानजनक विधान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक केली असून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं होतं. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ब्राह्मण समाजाविरुद्ध कथित अपमानास्पद विधान केल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही सांगत त्यांनी वडिलांवरील कारवाईचं समर्थन केलं होतं. ‘सर्व ब्राह्मण समाज’ या संघटनेच्या तक्रारीच्या आधारे डी.डी. नगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. धर्म, वंश इ. आधारावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे यांसह इतर आरोपांखाली भादंविच्या विविध कलमांखाली हे प्रकरण नोंदवण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहन लोकांना केलं, तसंच ब्राह्मणांना आपल्या खेड्यात प्रवेश करू देऊ नका असंही सांगितलं, असं संघटनेने तक्रारीत म्हटले होतं. ब्राह्मणांना देशातून ‘घालवून द्या’ असंही आवाहन ते लोकांना करत असल्याचा आरोप त्यांनी बघेल यांच्यावर केला होता.
यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद वक्तव्य केले होते, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.