विरवडे : मोहोळ तालुक्यातील दादपूर – पिरटाकळी रोडलगत असलेल्या राखीव वन क्षेत्रात दुचाकीवरून अज्ञात दोन व्यक्ती घेऊन जात होते. शिकार करण्याच्या उद्देशाने काळवीट पकडून त्याचे पाय बांधून घेऊन जात असताना कामती पोलिसांच्या पथकाला पाहताच दुचाकी व काळवीट तिथेच सोडून पळून गेले.
ही घटना काल सोमवा, 6 सप्टेंबर रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात दोघांच्या विरोधात वनजीव संरक्षण अधिनियमानुसार कामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान गोफनीय खबर्याने सहाय्यक पोलीस फौजदार एम टी पवार यांना माहिती दिली की, दादपूर गावाजवळी राखीव वन क्षेत्रामध्ये एका दुचाकीवर दोघेजण काळवीट, पाय बांधून, घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने कामती पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहतात दुचाकीवरील दोघे जण अज्ञात व्यक्ती, दुचाकी (क्र एम एच 13डी आर 6348) गाडी व पाय बांधलेल्या अवस्थेतील काळवीट हे हरीण जागेवर सोडून पळून गेले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलीस पथकाने सदर दुचाकी व काळवीट कामती पोलीस ठाण्यात आणले व या संदर्भात वन विभागाला माहिती देऊन सदरचे काळवीट हरिण त्यांच्या ताब्यात दिले. सदरील काळवीट हे चार वर्षाची असून दोन अज्ञात व्यक्तीने शिकार करण्याच्या उद्देशाने त्यास पकडून पाय बांधून हत्या करण्याकरिता घेऊन जात असतानाच कामती पोलिसाने पकडले. पोलिसांमुळे काळवीट हरणाचे प्राण वाचले, या प्रकरणात अज्ञात दोघांविरोधात वन संरक्षण कायद्यान्वये कामती पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोरकर यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.
“काळवीट घेऊन जाणारे आरोपी निष्पन्न झाले असून या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके केली आहेत, लवकरात लवकर संशयितांना ताब्यात घेण्यात जाईल”
अंकुश माने – सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस स्टेशन