मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. अक्षय कुमारने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून अरुणा भाटिया यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हा आपल्यासाठी खूप कठीण काळ असल्याचे अक्षयने म्हटले आहे. तसेच आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही अक्षयने आपल्या चाहत्यांना केले होते.
मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली.
अक्षय कुमारच्या आईची तब्येत बिघडली तेव्हा तो परदेशात शूटिंग करत होता. अक्षयला ही बातमी समजताच तो लगेच लंडनहून मुंबईला परतला होता. मात्र, अक्षय कुमारच्या आईला नेमकी काय झाले होते हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमिटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.
ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईसाठी चाहत्यांना दुवा करा, असं म्हटलं होतं. माझ्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं अक्षय कुमारने आईच्या आजारपणादरम्यान म्हटलं होतं.