काबूल : तालिबानने नव्या सरकारची स्थापना करताच अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंवर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला आता इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. महिलांनी खेळात भाग घेणे गरजेचे नाही, कारण त्यामुळे त्यांचे शरीर दिसून पडते, असे, तालिबानचा सांस्कृतिक आयोगाचा उपप्रमुख अहमदुल्लाह वासिकने म्हटले आहे. महिलांच्या शिक्षण घेण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहे.
नुकतंच तालिबानच्या सरकारने आपला अजेंडा जाहीर केला आहे. यापुढे अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणार असल्याची घोषणा तालिबानच्या नव्या सरकारने केली आहे. देशात इस्लामिक नियम आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असं तालिबानच्या नव्या सरकारचा प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने स्पष्ट केलं आहे. आमच्या समाज वर्तुळात महिलांचा सक्रिय सहभाग आम्हाला हवा आहे. आमच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची मनाई नाही. अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल, असंही त्यांनी म्हटलंय.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता अफगानिस्तानच्या क्रिकेटवर संकट आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणणं आहे की, जर तालिबान अफगानिस्तानमधील महिला क्रिकेटवर बंदी आणणार असेल तर ते नोव्हेंबरमधील हा कसोटी सामना रद्द करतील.
क्रिकेट टीमच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं आहे की, जर तालिबान सरकारकडून महिलांना क्रिकेट खेळू दिलं जाणार नाही हे खरं असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानमधील कसोटी सामना रद्द केला जाईल. अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. जर तालिबान्यांनी महिलांना क्रिकेट खेळू दिले नाही, तर आम्ही अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेटपटूंच्या संघाला कोणत्याही स्पर्धेसाठी आपल्या देशात प्रवेश देणार नाही, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. खेळताना शरीर दिसते, असे म्हणत तालिबानने महिला खेळाडूंवर बंदी घातली आहे.
जर तालिबाननं अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला बॅन केलं तर अफगाणिस्तानला आयसीसीच्या नियमित सदस्यत्वाचा दर्जा देखील गमवावा लागेल. आयसीसी त्याच देशांना नियमित सदस्यत्व देतं ज्या देशाचे महिला क्रिकेट संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात.