सोलापूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना जोडभावीपेठ परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक खंडू सर्वगोड (वय१९ रा. नंदूर तालुका दक्षिण सोलापूर) याला अटक करून त्याच्या विरुद्ध बलात्कार आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला.
त्या अल्पवयीन तरुणीला अभिषेक सर्वगोड याने लग्न करतो असे सांगून तिच्याशी ८ ऑगस्ट रोजी अत्याचार केला होता, अशा आशयाची फिर्याद जोडभावीपेठ पोलिसात दाखल झाली. आरोपीला आज रविवारी अटक करण्यात आली असून त्याला उद्या सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी हे पुढील तपास करीत आहेत .
* भुलीचे इंजेक्शन घेऊन नवविवाहित परिचारिकेची आत्महत्या
सोलापूर : दोन आठवड्यांपूर्वी विवाह झालेल्या एका २५ वर्षीय परिचारिकेने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. ही घटना वडगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
विशालक्ष्मी इरण्णा स्वामी (वय २५ रा. वडगाव ता. दक्षिण सोलापूर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. तिचा विवाह दोन आठवड्यापूर्वी झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काल सायंकाळच्या सुमारास तिने घरात असताना स्वतः हाताला इंजेक्शन घेतली होती. तिला बेशुद्धावस्थेत वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार ज्योतिबा पवार हे तपास करीत आहेत.
* पडसाळी येथे दगडाने मारहाण
पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे भावकीतील शेतजमिनीचा भांडणातून काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत दत्तात्रय भोसले (वय२६) आणि त्याचे वडील नानासाहेब भोसले हे दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुक्याच्या पोलीसांनी गोविंद भोसले व त्याची दोन मुले सचिन आणि नितीन भोसले अशा तिघांवर गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार शेख पुढील तपास करीत आहेत.
* पावसाच्या पाण्यावरुन मारहाण
चिनके (ता. सांगोला) येथे पोलिसात तक्रार दिल्याचे आणि पावसाचे पाणी आमच्या घरासमोर वळविल्याच्या कारणावरून घरात घुसून लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत महादेव कृष्णा कोरे ( वय४२) हे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलीसांनी तानाजी गणपत कवठेकर त्याचे दोन भाऊ शिवाजी आणि जालिंदर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
* विळ्याने मारहाण; एक जखमी
सलगर (ता. मंगळवेढा) येथे बांधावर दगड रोवण्याचे भांडणातून विळा आणि लाकडाने केलेल्या मारहाणीत दयानंद विठ्ठल कोळी (वय२८) हा जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात मंगळवेढ्याच्या पोलीसांनी जालिंदर काटकर त्याची तीन मुले बाळासाहेब, संतोष आणि कोंडीबा काटकर अशा चौघांवर गुन्हा दाखल केला. हवालदार येलपले पुढील तपास करीत आहेत .