मुंबई : मागील अनेक वर्षापासून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ्यातील टाईम ठरला आहे. येत्या गुरुवारी, १६ सप्टेंबर रोजी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरेखा पुणेकर (surekha punekar) राष्ट्रवादीचे (ncp) चे घड्याळ अधिकृतरित्या हातावर बांधणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर राजकीय पटलावर उतरणार असल्याची नेहामीच चर्चा होत होती. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं. तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते, अशीही शक्यता वर्तवली गेली होती. त्यात आता राष्ट्रवादीने सुचवलेल्या राजू शेट्टी यांच्या नावास कात्री लागणार असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे सुरेखाताईंचा तीत वर्णी लागू शकते. म्हणूनच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा घाट घातला जात आहे.
सुरेखा पुणेकर या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आहेत. लावणी म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे अदाकारा व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कलाच होय, लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली आणि तेव्हा पासूनच लावणी व सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द उदयास आले. त्यांच्या कलेचे कौतुक आजही सगळीकडे होत असतं. मागील लोकसभा निवडणुकीत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं बोललं जातं होतं. परंतु काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं होतं.
देगलूर-बिलोली मतदार संघातील रिक्त जागेसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर इच्छुक होत्या. या जागेसाठी शिवसंग्रामकडूनही त्या इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला त्यांनी नकार दिला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ”मोहोळ विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये मी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून इच्छुक होते. पण पक्षप्रवेश झाला नव्हता. यावेळी मात्र कुठल्याच अपेक्षेने राष्ट्रवादीत प्रवेश करीत नाही.”
सुरेखा पुणेकर या आज लावणी समाज्ञी असल्या तरी त्यांचा जीवनप्रवास अतिशय गरीब कुटुंबातून सुरु झाला आहे. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत. अनेकवेळा खायला देखील त्यांच्या घरात काहीही नसायचे. पण या सगळ्या वाईट परिस्थितीवर मात करत त्यांनी आज मोठे यश मिळवले आहे. सुरेखा पुणेकर यांचा महाराष्ट्रात चांगलाच चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळाली होती.
“आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत, गेल्या दोन वर्षात झालेल्या कोवीडच्या कारणाने कलाक्षेत्राची हानी झालेली आहे आणि त्यासाठी फार कुणी राजकीय स्तरावर पाठपूरावा केल्याचे मला अनुभवायला आले नाही”
– सुरेखा पुणेकर