मोहोळ : मोहोळ येथील भाजप नेते संजय क्षिरसागर यांच्या विरोधात जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी दाखल केलेली तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ सप्टेंबर रोजी निकालात काढली. त्यामुळे संजय क्षिरसागर यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील भाजप नेते संजय क्षिरसागर यांनी तहसीलदार मोहोळ यांचेकडून दाखला मिळालेला असताना उपविभागीय अधिकारी सोलापूर यांचेकडून दुसरा जातीचा दाखला मिळवला आहे. पूर्वीचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती पडताळणी समितीस न देता माहिती लपवून दूसरा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे मिळविल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी २४ मे २०२१ रोजी संजय क्षीरसागर यांचा जातीचा दाखला जप्त करण्याची मागणी जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती.
या संदर्भात जातपडताळणी समितीकडे सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान तक्रारदार शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र पडताळणी समितीने यापूर्वी एका प्रकरणात संजय क्षिरसागर यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे “महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग अधिनियम २००० चे कलम ७(२) नुसार समितीने घेतलेला निर्णय अंतिम असून त्यास भारतीय संविधानातील कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागता येते, अशी तरतूद आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांमध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून तसे समितीस अधिकार नाहीत” असे निरीक्षण नोंदवत जिल्हा जात पडताळणी समितीने तक्रारदार शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांचा तक्रारी अर्ज ९ सप्टेंबर रोजी निकालात काढला आहे. या आदेशामुळे संजय क्षिरसागर यांना पडताळणी समितीकडून दिलासा मिळाला आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो. जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे काँग्रेस नेते गौरव खरात यांनी सांगितले.
माझ्या जातीच्या संदर्भात शिवाजी सोनवणे आणि गौरव खरात यांनी तक्रार दाखल केली होती. पडताळणी समितीला मी माझ्या आजोबा पणजोबाचे पुरावे दिल्याने समितीने यापूर्वीच मला वैधता प्रमाणपत्र दिले आहे. ९ सप्टेंबर रोजी समितीने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे संजय क्षिरसागर यांनी सांगितले.