औरंगाबाद / मुंबई : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मोठं विधान केलं. ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी’, असं ठाकरे म्हणाले. त्यामुळे त्यांनी भाजपला खुली ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे काल चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, 2-3 दिवसांत कळेल, असं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एका वृत्तवाहिनीसमोर चिमटा काढला आहे. दानवे आणि चंद्रकांत पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले. भाजप दोन वर्षापासून सत्तेत यायचं म्हणतोय पण ते शक्य नाही. चंद्रकांतदादांना मंत्री व्हायच असेल तर त्यांनाच शिवसेनेत याव लागेल. काही दिवसांपासून शिवसेनेत दोन मोठ्या नेत्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा होती. ते हेच दानवे आणि चंद्रकांत पाटील दोन नेते असतील, असेही म्हटले आहे.
‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत ठाकरेंनी दानवे यांच्याकडे पाहिले. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात खेळीमेळीचं वातावरण दिसून आलं. या दोघांमध्ये काही कानगोष्टी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. यावर दानवे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांना जो अनुभव आलाय त्यावरून ते म्हणाले असतील ते म्हणाले असतील रावसाहेब आपण भविष्यात एकत्र येऊ शकतो. आम्ही समविचारी आहोत. समविचारी पक्ष एकत्र यावेत हीच भाजपची भूमिका आहे,’ असं सूतोवाच दानवे यांनी केलं आहे.
‘तिकडे आलबेल सुरु नाहीये. मला मुख्यमंत्री कानात असं म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं मला त्रास द्यायला लागले तर भाजपच्या कोणत्या तरी नेत्याला मी बोलवून घेईन. यासोबतच त्यांनी या कधी, बसू. बोलू असं निमंत्रण त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच केलं. त्यामुळे पूर्वमित्रचे आम्ही पुन्हा मित्र होऊ शकतो’ असं महत्वाचं विधान रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान या दिवसभराच्या राजकीय घडामोडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशा प्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल’, असं फडणवीस म्हणाले. भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शिवसेना – भाजप कदापी युती होणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील. काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित असल्याचे सांगितले.
* मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, राज्य सरकार सहकार्य करेल
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या जनहिताच्या कामाबद्दल कोणतेही राजकीय मतभेद असतील, तर ते सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजेत असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. दानवे यांनी यावेळी मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा विचार बोलून दाखवला होता.
* मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या 8 मोठ्या घोषणा
– मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप.
– औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार.
– परभणीत शासकीय महाविद्यालय.