मोहोळ : मोटारसायकलला कंटेनरने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना मोहोळ कुरुल रोडवर नजीक पिंपरी येथे घडली. आणखी एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूर ग्रामीण भागात गणपती विसर्जनावेळी एका तरुणाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसभर काम करून आपल्या सध्या रहात असलेल्या पिंपरी गावातील घराकडे निघाले असताना बिरू खंडू पांढरमिसे (वय ५० रा. शिरापूर सध्या नजीक पिंपरी) यांना कंटेनर (क्रमांक टी एन o ६ क्यु ४ ९ ८ ७) याने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांची मोटारसायकल व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेले.
सोलापुरात उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत कंटेनर चालक राकेश मनी राम (रा धन्डाल लेखु राजगर जि चोरू राजस्थान) याच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.
* बाणेगाव येथे दुचाकीच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर : बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे दुचाकीच्या धडकेने संतोष बबन आळंगे (वय ३८ रा. बाणेगाव ) हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. हा अपघात सोमवारी दुपारच्या सुमारास घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संतोष आळंगे हे दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास रस्त्यावरून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून एमएच१३- सिव्ही-१२४३ या क्रमांकाची दुचाकी धडकल्याने डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते वाटेतच मरण पावले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* गणपती विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू
सोलापूर : गणपती विसर्जनाच्या वेळी शमशापूर (ता. उतर सोलापूर) येथील सीना नदीच्या पात्रात बुडून मयत झालेल्या सागर अमरसिंग मदनावाले (वय २२ रा. उत्तर सदर बझार, लोधीगल्ली) याचा मृतदेह तब्बल २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज सोमवारी दुपारच्या सुमारास हत्तुर येथे आढळून आला. काल रविवारी दुपारच्या सुमारास तो पाण्यात बुडाला होता.
सागर मदनावाले हा काल रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शमशापुर येथील नदीत गणपती विसर्जनासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासी, मच्छिमार, अग्निशामक दल आणि ग्रामीण पोलिसांनी त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशारीपर्यंत मिळून आला नाही.
आज सकाळपासून पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास हत्तुर शिवारातील गुरप्पा वाले यांच्या शेताजवळच्या नदीपात्रात त्याचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला. मयत सागर मदनावाले हा अविवाहित असून तो मजुरीचे काम करीत होता. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून फौजदार दीपक दळवी हे पुढील तपास करीत आहेत.