सोलापूर : मंगळवेढा मार्गावरील देगाव ब्रिज जवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सिद्रामप्पा अशोक हुलजंती ( वय३० रा. मांजरा सोसायटी, विकास नगर सोलापूर) हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. हा अपघात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.
सिद्रामप्पा हुलजंती हा काल रात्री सांगोला येथून सोलापूरकडे दुचाकीवरुन निघाला होता. देगाव ब्रिज जवळील काळजे वस्तीजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने तो गंभीर जखमी होऊन रात्रीच मयत झाला. मयत हुलजंती याच्या पश्चात आई वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तो एलआयसीचे काम करीत होता. अशी प्राथमिक नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
* बार्डी येथे द्राक्ष बागेचे नुकसान, ४जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – बार्डी (ता. पंढरपूर) येथे राहणाऱ्या सचिन महादेव कवडे यांच्या द्राक्ष बागेतील ३०० झाडे तोडून ७५ हजाराचे नुकसान केले. त्यानंतर ६० हजाराचे लोखंडी अँगल चोरून नेले. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
या प्रकरणात करकंबच्या पोलिसांनी भाऊसाहेब गायकवाड, त्यांची दोन मुले पांडूरंग व अक्षय तसेच प्रभाकर गायकवाड (सर्व रा. बार्डी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार गिरमकर पुढील तपास करीत आहेत.
* मोहोळ येथे घरफोडी
सोलापूर – मोहोळ येथील बागवान नगरात राहणाऱ्या शाहरुख रमजान बागवान यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील १ लाख रुपये रोख आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६५ हजाराचा ऐवज पळविला. ही चोरी गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाली. बागवान यांनी यासंदर्भात मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली फौजदार जाधव पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नोकरी डॉट कॉम वरून बोलतो म्हणून सांगून ९२ हजाराला गंडा
सोलापूर : नोकरी डॉट कॉम ऑफिस मधून बोलत आहे असे सांगून एकास ९२ हजार ७२० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना १५ जुलै २०२१ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी सागर नवनाथ गायकवाड (वय-३१,रा. समर्थ निवास,अवांती नगर,सोलापुर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरुन अनन्या शर्मा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी सागर गायकवाड हे घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर नोकरी डॉट कॉम पुणे ऑफिस मधून बोलतो असे सांगून बायोडाटा अपडेट झाला आहे. त्याचे तुम्हाला दहा रुपये ऑनलाइन भरावे लागतील असे म्हणून फिर्यादीच्या मोबाईल वर लिंक पाठवून पैसे पाठवण्यास सांगितले.त्यावेळी सागर गायकवाड यांनी पाच ते सहा डेबिट व क्रेडिट कार्ड वरून पुन्हा पुन्हा प्रक्रिया केली असता, ट्रांजेक्शन फेल झाले.त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून ९ हजार ९७८ रुपये व १० हजार रुपये व क्रेडिट कार्ड मधून २४ हजार ७२० रुपये असे तीन ट्रांजेक्शन झाल्याचे मेसेज आले. त्यावेळी फिर्यादीच्या लक्षात आले की फिर्यादीचे ९२ हजार ७२० रुपयेची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भालचिम हे करीत आहेत.