सोलापूर : महापालिकेतील सत्ताधिकारी, भाजपाचे महापौर, सभागृह नेते पदाधिकारी व माजी मंत्री, आमदार यांनी काल मंगळवारी राज्याचे राज्यपाल यांना भेटून सोलापुरातील विकासकामांबद्दल निवेदन दिले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बद्दल खोट्या तक्रारी व खोटी माहिती दिली. तशा आशयाची माहिती प्रसारमाध्यमांतून आली. त्यास आज राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे.
यावर आज सोलापूर शहर राष्ट्रवादी चे पदाधिकारी, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व गटनेते यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपा नियुक्त राज्यपालांना भेटून सोलापूरच्या विकासाबद्दल निवेदन देणे म्हणजे मनपा मध्ये स्वतः सत्तेवर असताना स्वतः तर कामे करायचेच नाही परंतु शहराच्या विकासाचे राजकारण करत एक स्टंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप गटनेते किसन जाधव यांनी केला. राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे विकासकामांबद्दल निधी मागायचा सोडून, शासनदरबारी जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करायचा सोडून राज्य सरकार बद्दल मनात द्वेषभावना ठेवून राज्यपालांकडे अशाप्रकारे निवेदन देणे खेदाची बाब असल्याचे सांगितले
काल भाजपाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे महाविकास आघाडी बद्दल तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी कोणताच निधी सोलापूरच्या विकासासाठी दिला नसल्याचे खोटेनाटे सांगत तशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे पहावयास मिळाल्याचे सांगत याबाबतीत सत्यता जनतेसमोर मांडताना जेव्हा जिल्ह्याला प्रथम दिलीप वळसे-पाटील हे पालकमंत्री म्हणून लाभले तेव्हा त्यांनी ९.८६ कोटीचा निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणासाठी दिल्याचे, तसेच त्यानंतर २०२० मध्ये जेव्हा दत्तात्रय भरणे पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच डीपीडीसीच्या बैठकीत २०२०-२०२१ साठी ३३.५४ कोटीचा निधी सोलापूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता. तसेच सध्याला सोलापुरात महानगरपालिकेमध्ये भाजपचीच गेल्या पाच वर्षापासून सत्ता असून देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही. परंतु दत्तात्रय भरणे यांनी सर्व नगरसेवकांना समसमान निधी उपलब्ध करून द्या, तसा ठराव पाठवा, मी त्याला मंजुरी देतो असे सांगितले होते.
परंतु महापालिकेतील भाजपा महापौर, सभागृह नेते यांनी साधे बजेट देखील मांडले नाही, नगरसेवकांना समसमान निधीचा ठराव देखील पारित केला नाही – का तर त्याचे श्रेय पालकमंत्री भरणे यांना मिळेल, भाजपाला जनतेसमोर उघडे पडावे लागेल म्हणून….उलट आता हे भाजपाचे नेते पदाधिकारी राज्यपालांकडे जाऊन पालकमंत्र्यांनी शहराला काहीच नाही दिले असे रडगाणे गाताना दिसून येत असून ही बाब नक्कीच निषेधार्थ असल्याचे सांगितले.
भाजपाचे सध्याचे शहरातले आमदार व माजी मंत्री यांच्या कार्यालयासमोरील रस्ता केवळ झाला नसल्याचे कारण पुढे करत शहरात स्मार्ट सिटीची कामे होत नसल्याचे सांगत राज्यपालांना भेटल्याचे पहावयास मिळाले ही शोकांतिका आहे. मागील काळात भाजपचीच सत्ता (मनपा मध्ये अजून देखील) असताना स्मार्ट सिटी मधील भाजपाच्या नगरसेवक व मक्तेदार यांच्या कामाची बिले मिळत नाहीत म्हणून भाजपानेच स्मार्ट सिटी कार्यालयासमोर आंदोलन करणे ही शरमेची बाब जनतेला पहावयास मिळाली आहे. महानगरपालिकेमध्ये स्वतः सत्तेत असून महापौर यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनावर अंकुश ठेवून कामे करायला पाहिजे होती परंतु मक्तेदारांची बिले मिळविण्यासाठी उपोषणाला बसलेले दिसून येत आहेत.
परवाच्या 25 तारखेच्या महापालिका सभामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर मध्य साठी 25 कोटीचा निधी महापालिका व पीडब्ल्यूडी ला वितरित केल्याचे सांगत गटनेत्यांनी त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव देखील महापालिकेत मांडल्याचे नमूद केले असून या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी मनपा आयुक्तांना, PWD अधिकाऱ्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच विकास कामांच्या उद्घाटन वेळी नामफलकावर उपमुख्यमंत्री यांचा नामोल्लेख असावा हे देखील विनंतीपूर्वक सांगणार असल्याचे म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील भाजपा नेते पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्या बद्दल देखील राज्यपालांकडे विनाकारण खोट्या गोष्टी सांगितल्याची बाब निंदनीय असल्याचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगत पालकमंत्री भरणे मामा यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लॉकडाऊन असताना कोरोनाच्या गंभीर काळात अनेक हॉस्पिटल चालू करायला लावले, तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विविध हॉस्पिटल येथे दाखल करोना रुग्णांना भेटी दिल्या, त्यांना दिलासा देत राज्य प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मनपामधील सत्ताधाऱ्यांनी केलेला खोटा आरोप खोडून काढताना सोलापूर शहर जिल्हा सध्या लसीकरणाच्या बाबतीत राज्यात पहिल्या चारमध्ये असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोरामणी येथील कार्गो विमानतळासाठी मंजूर केलेला ५० कोटीचा निधी तसेच शहरातील महिला जिल्हा रुग्णालयासाठी दिलेला १४ कोटी निधीची मंजुरी असे जवळपास १०० कोटीचा निधी शहराला दिल्याचे सांगितले.
करोना काळात जेव्हा भाजपाचे नेते पदाधिकारी घरी बसले होते तेव्हा पालक मंत्री स्वतः शहरात फिरत होते. अगदी महापौर ह्या कुटुंबासह रुग्णालयात दाखल होत्या त्याचे देखील पालकमंत्री भरणेंनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. परंतु आता हेच पदाधिकारी पालकमंत्र्यांवर विनाकारण खोटे आरोप करत आहेत.
गेली जवळपास साडेचार वर्षे मनपा मधील सत्ताधारी भाजपा नेते, पदाधिकारी हे मनपा बजेट असेल वा स्थायी समिती चा विषय, शहरातील रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत सपशेल फेल ठरलेले आहेत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या साठी पुन्हा एकदा जनतेच्या समोर मतदान मागण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे व त्या वेळेला जनतेने विकास कामांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काहीच नसल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून हे काल राज्यपालांना भेटून आपले अपयश झाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु जनता आता भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नसून सोलापुरातील जनता नक्कीच सत्ता बदल करेल असे वाटते.
* शरद पवारांच्या सोलापूर दौ-यात बदल
तसेच येत्या ९ ऑक्टोबर रोजी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे एक दिवसीय दौऱ्यावर सोलापूरला येणार होते. मात्र आता एक दिवस अगोदर ८ अॉक्टोबरला येणार असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले. या दौऱ्यात शरद पवार हे शहरातील प्रमुखांशी सकाळी काही वेळ चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारच्या वेळेस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी यांचे समवेत व त्यानंतर शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या समवेत मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटने बाबतीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.