सोलापूर : कटफळ (ता. सांगोला) येथे राहणाऱ्या काजल गुलाब सावंत या महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवीत त्यांच्या गळ्यातील २० हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पसार झाल्याची घटना बुधवारी रात्री च्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलीसांनी भारत महिपती वाघमारे (वय ३० रा. कटफळ) याच्याविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला.
काजल सावंत या बुधवारी रात्रीच्या सुमारास आपल्या मुलासोबत घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी भारत वाघमारे हा घरात बसून त्यांना तुझा नवरा कुठे आहे ते सांग? असे म्हणत त्यांना चाकूचा धाक दाखविला. आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन दुचाकीवरून पसार झाला, अशी नोंद पोलिसात झाली आहे .
* जागेच्या वाटणीवरून काठीने मारहाण
सोलापूर : जागेच्या वाटणीवरून शिवीगाळ करत बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुमार स्वामी नगर सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सादिक शब्बीर हुंडेकरी (वय-३५,मेहताब नगर,शेळगी सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शब्बीर हुंडेकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
* न्यायाधीशाच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड गेले चोरीला
माळशिरस : माळशिरस दिवाणी न्यायाधीश जी.एम. नदाफ यांच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. ही चोरी बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत माळशिरस तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली आहे. चोरट्यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शिताफिने या चंदनाच्या झाडाचा मुख्य बुंधा करवतीने कापून नेला. न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
दोन वर्षांपूर्वी देखील माळशिरस येथील न्यायाधीशांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. येथील चंदनाचे झाड चोरून नेण्याची ही दुसरी घटना आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सतत होणार्या चोरींच्या घटनांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाकडे नोंद केलेल्या या चंदनाच्या झाडाची किंमत ही जवळपास सात हजार रूपयांच्या आसपास होती. या घटनेची फिर्याद कोर्ट कर्मचारी आकाश सावंत यांनी माळशिरस पोलीस ठाणे येथे दिली असून पुढील तपास हवालदार गायकवाड करत आहेत.
* राजीव गांधी नगरात गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मजरेवाडी परिसरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या एका ३९ वर्षीय विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
यशवंत आनंदअप्पा बडुरे वय ३९ (रा.राजीव गांधी नगर) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी घरातील बाथरूमच्या छताच्या लाकडी वाशाला त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . मयत यशवंतयाच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो एका हाताने अपंग होता. त्याची पत्नी मजुरी करीत होती.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून हवालदार भोई हे पुढील तपास करीत आहे.
* पाय घसरून पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू
लिमयेवाडी परिसरातील ब्राह्मण गल्ली राहणारे भारत भगवान इंगळे (वय७५) हे राहत्या घरात पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन मयत झाले. ही घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलीसात झाली आहे .
* आष्टे येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
आष्टे (ता.मोहोळ) येथे राहणारी स्वरांजली औदुंबर सोंडगे (वय २१) या विवाहितेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. तिला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पतीबरोबर झालेल्या भांडणातून तिने हा प्रकार केला. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* पाथुर्डी येथे मारहाण पिता-पुत्र जखमी
पाथुर्डी (ता. करमाळा) येथे जागेच्या वादातून लोखंडी गज आणि काठीने केलेल्या मारहाणीत रघुनाथ सोनवळ (वय३७) आणि त्याचे वडील छगन सोनवळ (वय६५) हे दोघे जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गावात घडली. त्यांना करमाळा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोरख पांडुरंग मोरे, अतुल मोरे आणि अन्य पाच जणांनी त्यांना मारहाण केल्याची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* आर्थिक अडचणीतून आत्महत्येचा प्रयत्न
धोत्री (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या आकाश संतोष हुक्के (वय२३) या तरुणाने गावात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.आर्थिक अडचणीतून त्याने हा प्रकार केला. अशी नोंद सिव्हील पोलिसात झाली आहे .
* भाजल्याने मजूर जखमी
बार्शी येथील एमआयडीसी मध्ये असलेल्या भैरव इंडस्ट्री मध्ये काम करताना दिनेश कुमार (वय४२) हा मजूर भाजून जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.तो कारखान्यात ॲल्युमिनियम वितळविण्याचे काम करीत होता. त्यावेळी अचानक भडका वळून अंगावर रसायन पडल्याने तो भाजला. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.