सोलापूर : शिरभावी (ता.सांगोला) येथे ४ हजार रुपये किमतीचे चंदनाचे लाकडे पिशवीतुन चोरून नेताना सांगोल्याच्या पोलिसांनी बाबा मच्छिंद्र बोडरे (वय३८ रा. शिरभावि) आणि अभिजीत संजय शिंदे (वय 25 रा. चिकमहुद) या दोघांना अटक केली. दुस-या घटनेत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी दोन लॉजचे व्यवस्थापक सहआरोपी झाले आहेत.
ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. ते दोघे पिशवीतून चंदनाचे लाकडे घेऊन गैरमार्गाने विक्री करण्यासाठी नेत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. चोरून आणलेली चंदनाचे लाकडे ते दोघे बापू पाटील (रा. सोनके ता. पंढरपूर) याला विकण्यासाठी जात होते. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार शिरसागर पुढील तपास करीत आहेत.
* अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी दोन लॉजचे व्यवस्थापक झाले सहआरोपी
बार्शी : अल्पवयीन मुलीवर लॉजवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील दोन लॉजच्या व्यवस्थापकांना सहअरोपी केले आहे. या व्यवस्थापकांना अटकेनंतर सुमारे 17 दिवस तुरुंगात रहावे लागले. त्यामुळे केवळ अनैतिक व्यवसायाला, गैरप्रकारांना आश्रय देवून त्याव्दारे पैसे कमविण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यात अलिकडे उदयास आलेल्या लॉजमालकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. यापुर्वीही अनेकवेळा महिलेंवरील अत्याचारांच्या प्रकरणात लॉजची नावे निष्पन्न झाली तरी लॉज चालक, व्यवस्थापकांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. यावेळी मात्र पो.नि. रामदास शेळके यांनी लॉज व्यवस्थापकांना थेट सहअरोपी केल्याने लॉजमालकांचे धाबे दणाणले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपीने पिडितेला शहरातील सिटी पॅलेस लॉज व जामगाव रस्त्यावरील हॉटेल व्हीएसपी राजे येथे नेवून अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सिटी पॅलेस लॉजचे व्यवस्थापक गणेश नागनाथ खुळपे व हॉटेल व्हीएसपी राजे चे व्यवस्थापक प्रवीण पोपट राऊत यांना सहअरोपी केले. त्यांना 1 सप्टेंबरला अटक केली. पोलिस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
सत्र न्यायलयाने त्यांना नंतर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र तोपर्यंत त्यांना बरेच दिवस तुरुंगाची हवा खावी लागली. या दोघांच्या अटकेनंतर बार्शीतील लॉजमध्ये चालणार्या गैरप्रकारावर काही अंशी प्रकाश पडला आहे. आगामी काळात पोलिस लॉजवर चालणार्या गैरप्रकारांना आळा घालतील, अशी अपेक्षा या कारवाईमुळे निर्माण झाली आहे.
* प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदारावर कारवाईचा बडगा
अकलूज – अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी प्लास्टिक बंदी आदेश लागू करून शहरातील प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदारावर कारवाई सुरू केली आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरातील मार्केट परिसरातील वेगवेगळ्या चार व्यापार्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. अकलूज नगर परिषदेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्लास्टिक मुक्तीसाठी नगरपरिषदेने कंबर कसलेली दिसत आहे. याचबरोबर अकलुज नगर परिषद हद्दीतील दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्या अधिकृत लेआउट मंजुरीचे अधिकार मुख्याधिकारी यांचेकडे असल्याने तीन ऑगस्ट नंतर नगर परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्याच बांधकाम परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत तसेच शहरी भागातील अकृषक परवानग्या देण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांना असल्याने विनापरवानगी बांधकामावर कारवाई होणार आहे तसेच अकृषक परवाने दिले जातील याची नोंद घ्यावी असे आवाहनही अकलूज नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.